वसई: मुसळधार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली असून, तानसा पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पावसाळ्यापूर्वी महामार्ग तसेच वसई विरार शहरातील अंतर्गत रस्त्यांवर डांबरीकरण आणि पॅचवर्कचे काम करण्यात आले होते. मात्र, आठवडाभराच्या पावसामुळे या रस्त्यांची पुन्हा एखादा दुरावस्था झाली आहे. गेले कित्येक दिवस रस्ते पाण्याखाली असल्यामुळे ही परिस्थिती लक्षात आली नसली, तरी पावसाचे पाणी ओसरल्यानंतर मात्र खड्ड्यांची समस्या प्रकर्षाने जाणवू लागली आहे.
संततधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका मुंबई-अहमदाबाद महामार्गालाही बसला आहे. मुंबई, ठाणे, घोडबंदर, पालघर आणि गुजरातसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणाऱ्या या मार्गाची अवस्था आठवडाभरात दयनीय झाली आहे. वसई पूर्वेतील तानसा खाडीवरील पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर या पुलावर काही खड्डे इतके खोल झाले आहेत की काँक्रीटच्या थरातील लोखंडी सळ्या वर आल्या आहेत.
यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना आणि खासकरून दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यापूर्वी या परिसरात चार अपघात झाले असून याची प्रशासनाने गंभीर दखल घेत हे महामार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.
लोखंडी सळ्यांमुळे टायर फुटण्याची भीती
मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरील पुलावर किमान तीन ठिकाणी असे धोकादायक खड्डे पडले आहेत. की या खड्यांमधून वाहनांना बाहेर आलेल्या लोखंडी सळ्यांमधून मार्ग काढावा लागत असल्याने टायर फुटण्याचा, नुकसान होण्याचा व अपघाताचा धोका वाढला आहे. भरधाव अवजड वाहनांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. या खड्यांमुळे अनेक वाहनांचे टायर पंक्चर होत असल्याचे चांदीप गावचे नागरिक संजय पाटील यांनी सांगितले.
