मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पूल परिसरात मंगळवारी दुपारपासून अत्यंत भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. घोडबंदर काजूपाडा येथे मिरा-भाईंदर महापालिकेकडून सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे ही कोंडी झाली. रस्ते दुरुस्ती सुरू असताना काही वाहनचालकांनी घाईगडबडीत विरुद्ध दिशेने (रॉंग साईड) वाहने चालवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे वाहनांची एकापाठोपाठ एक रांग लागून परिस्थिती अधिकच बिकट झाली.

​या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका वसई पूर्वेकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना बसला. घोडबंदर रोड, ससूनवघर, मालजीपाडा ते थेट मिरा-भाईंदरच्या काशीमीरा परिसरापर्यंत तब्बल १५ किलोमीटरहून अधिक लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गुजरातकडून मुंबईच्या दिशेने आणि मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या दोन्ही वाहिनींवर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. गेल्या दोन तासांहून अधिक काळ वाहने अत्यंत धिम्या गतीने सरकत असल्याने, दैनंदिन प्रवासासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले.

​घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, बेशिस्त वाहनचालकांकडून थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे आधीच कोलमडलेली वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यात पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अखेर अर्ध्या ते एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली, अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली

खड्ड्यांचा जाच

मुंबई, ठाणे, वसई-विरार, मिरा-भाईंदर आणि पालघर या महत्त्वाच्या शहरांना थेट गुजरातशी जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग मानला जातो. मात्र, मागील काही वर्षांपासून सतत साचणारे पाणी, रस्त्यांवर पडलेले महाकाय खड्डे, वाढते अपघात आणि रोजचीच वाहतूक कोंडी यांमुळे हा महामार्ग प्रवाशांसाठी न संपणारी डोकेदुखी ठरला आहे. महिनाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावरील डांबर आणि खडी पूर्णपणे वाहून गेले असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, तर काही भागांतील काँक्रिटही उखडले आहे. विशेषतः जुन्या वर्सोवा पुलावर खड्ड्यांचे प्रमाण अधिक असल्याने अपघाताचा धोका टाळण्यासाठी वाहनचालकांना अतिशय धीम्या गतीने वाहने चालवावी लागत आहेत, ज्यामुळे ही कोंडी अधिक गंभीर बनली  असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे