वसई: वसई-विरार शहराच्या पूर्वेकडून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. गुरुवारी सकाळी महामार्गावरील गुजरात वाहिनीवर नायगाव बापाणे फाटा ते ससूनवघर या सुमारे पाच किलोमीटरच्या पट्ट्यात वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्यामुळे भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली.
एरव्ही मुंबई-ठाणे वाहिनीवर रोषाला सामोरे जावे लागणाऱ्या प्रवाशांना आज वसई-विरारच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरच मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. या अचानक उद्भवलेल्या कोंडीमुळे सकाळी कामावर निघालेले नोकरदार, कामगार वर्ग आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल झाले.
महामार्गावरील या सातत्यपूर्ण वाहतूक कोंडीमागे जागोजागी पडलेले खड्डे, वाहतूक नियोजनाचा प्रचंड अभाव आणि रस्त्यांवर होणारे बेकायदेशीर पार्किंग ही मुख्य कारणे ठरत आहेत. विशेषतः रेल्वे पुलाखालील भागात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमालीचा मंदावला असून, त्यामुळे वाहनांची एकापाठोपाठ एक रांग लागून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. त्यातच काही वाहनचालकांनी अधीर होऊन विरुद्ध दिशेने (मुंबई-ठाणे वाहिनीवर) गाड्या घालण्याचा प्रयत्न केल्याने महामार्गावर दुहेरी कोंडीची भीती निर्माण झाली होती.
घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांचा प्रचंड वेळ वाया गेला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावरील अडथळे दूर करून वाहतूक पूर्ववत व सुरळीत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करून शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थापन लागू करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि नियमित प्रवाशांकडून केली जात आहे.
