वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळपासूनच भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वर्सोवा पूल ते मालजीपाडा दरम्यान महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. वसई पूर्वेच्या भागातून जाणाऱ्या या महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर सकाळपासूनच घोडबंदर रोड ते ससूनवघर आणि मालजीपाडा दरम्यान वाहनांचा वेग कमालीचा मंदावला आहे. तर दुसऱ्या बाजूला गुजरात तसेच वसईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरही अशीच विस्कळीत परिस्थिती पाहायला मिळत असून सर्व वाहने अतिशय धिम्या गतीने पुढे सरकत आहेत.त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे.

​हा महामार्ग मुंबई, ठाणे, वसई-विरार, मिरा-भाईंदर, पालघर आणि गुजरात यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे.मात्र, मागील काही वर्षांपासून या महामार्गावर सतत साचणारे पाणी, रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे, अपघातांचे वाढते प्रमाण आणि नियमित होणारी वाहतूक कोंडी यांमुळे हा संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी रोजची मोठी डोकेदुखी ठरत आहे.

शुक्रवारी पुन्हा एकदा या महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. मुंबई वाहिनीवर काशीमिरा परिसरामध्ये रस्ते दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असल्याने तेथे एकाच मार्गिकेवरून दोन्ही बाजूंची वाहतूक चालवली जात आहे. रस्ता अरुंद झाल्याने वाहनांची गती मंदावली आणि काही वेळातच वाहनांच्या लांब रांगा लागल्याने कोंडी निर्माण झाली. तर दुसरीकडे, गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर ‘कच्छ दरबार’ आणि त्यापुढील टप्प्यात दोन मोठे कंटेनर अचानक बंद पडल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले.सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळीच ही कोंडी निर्माण झाल्याने रोजच्या कामावर जाणारे चाकरमानी, शाळकरी विद्यार्थी आणि इतर अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडलेले नागरिक महामार्गावर तासन्‌तास अडकून पडले.

त्यातच भर म्हणजे, कोंडीतून लवकरात लवकर बाहेर पडण्याच्या घाईत काही बेशिस्त वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने चालवण्याचा प्रयत्न केला. या बेजबाबदार प्रकारामुळे आधीच विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था अधिकच कोलमडली असून सर्वसामान्य वाहनचालकांना आणि प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सायंकाळपर्यँत महामार्गावर कोंडी कायम राहिल्याने याचा फटका आजूबाजूच्या गाव पाड्यात राहणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन दळणवळणालाही मोठा फटका बसला.

​सध्या वाहतूक पोलिसांकडून र वाहतूक सुरळीत करण्याचे आणि नियोजनाचे काम वेगाने सुरू आहे. बंद पडलेले कंटेनर हटवून आणि विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना अटकाव करून मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

अवजड वाहनांची अडवणूक होत असल्याने कोंडीत भर ?

मीरा-भाईंदर परिसरातील वाहतूक कोंडी मोकळी करण्यासाठी वसईहून मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक वर्सोवा ब्रिजवरच रोखली जात असल्याने वसई-पालघरकरांना मोठा फटका बसत आहे. वर्सोवा उड्डाणपुलावर वाहने थांबवल्यामुळे सातत्याने काजूपाडा ते बापाणे फाटा दरम्यान तब्बल १० किलोमीटरचा मार्ग पूर्णपणे ठप्प होत असून प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जात आहे. लहान-मोठे रस्तेकाम किंवा अपघाताच्या वेळी केवळ एका भागाचा ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी इतर मार्गांवर तासंतास कोंडी करणे हा नागरिकांवर अन्याय असल्याचे मत भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. या समस्येवर प्रशासनाने त्वरित मार्ग काढून अवजड वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.