वसई: नवी मुंबईतआयोजित ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी’ यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने जड व अवजड वाहनांना (सहा व दहा चाकी )बंदी घातली आहे. आयुक्तालयाने याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्ताने २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दिवशी खारघर येथील ओवे मैदानात ‘हिंद दी चादर’ या कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या वेळी लाखो नागरिक देखील येण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते.याच अनुषंगाने २८ फेब्रुवारी १ मार्च २०२६ या दरम्यान जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

दोन्ही दिवस सकाळी ५ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत ही बंदी लागू राहणार असून या कालावधीत महामार्गवर अवजड वाहने उभी करण्यास ही सक्त मनाई करण्यात आली आहे. तशी अधिसूचना पोलीस उपआयुक्त (मुख्यालय )अशोक तानाजी विरकर यांनी जारी केली आहे.

वाहतूक निर्बंध व पर्यायी मार्ग

राष्ट्रीय महामार्ग क्र ४८- गुजरात बाजूकडून येणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना खानिवडे टोल नाका येथे प्रवेश बंद असून मनोर (टेन नाका) -पाली-वाडा नाका-शिरीष पाडा -अबिटघर – कांबरे – पिवळी केल्हे- दहागांव मार्गे वासिंद येथुन नाशिकच्या बाजूने पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे

महामार्गावर विरार बाजूकडून येणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना शिरसाट फाटा येथे प्रवेश बंद असून या वाहनांना पर्यायी मार्ग शिरसाट फाटा पारोळ अकलोली (गणेशपुरी) अंबाडी असा मार्ग असणार आहे.

वसई बाजूकडून येणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.पर्यायी मार्ग चिंचोटी मार्गे कामण- खारबांव अंजूरफाटा, भिवंडीमार्गे जावे लागणार आहे.

पश्चिम द्रुतगतीमार्ग मुंबई व काशिमीरा बाजूकडून घोडबंदर रोड, ठाणे करीता जाण्यासाठी जड-अवजड वाहनां प्रवेश बंद असून ही वाहने वर्सोवा पुलावरून सरळ गुजरात राष्ट्रीय महामार्गावरुन शिरसाट फाटा-पारोळ- अकलोली (गणेशपुरी) अंबाडी मार्गे किंवा चिंचोटी – भिवंडी या पर्यायी मार्गाने जाऊ शकतात.

या वाहनांना प्रवेश सुरू
सर्व हलकी वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन दल, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने, अत्यावश्यक सेवांची वाहने
यांना प्रवेश सुरू राहणार आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक मार्गात बदल केले असून या बदलांची वाहनधारकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.