वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मालजीपाडा, ससूनवघर परिसरात आरएमसी वाहतूक करणारी वाहने ही विरुद्ध दिशेने वाहतूक करू लागल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अशा विरुद्ध दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढू लागले आहे. याशिवाय विकासाची कामे ही या भागात वेगाने सुरू झाली आहे. त्यामुळे सिमेंट काँक्रिटीच्या रेडिमिक्सच्या मालाची मागणी ही वाढली आहे. याच अनुषंगाने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत विविध ठिकाणी रेडिमिक्स सिमेंट प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या कारखान्यातून दररोज अवजड वाहने, मिक्सर तसेच वाळूची वाहने ये-जा करत असतात. अगदी महामार्गाला लागूनच सिमेंट कारखाने असल्याने आरएमसी वाहने विरुद्ध दिशेने प्रवास करू लागली आहे.
दररोज आरएमसी वाहतूक करणारी वाहने सर्वाधिक विरुद्ध दिशेने प्रवास करताना दिसून येत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
आरएमसी वाहन चालक कोणत्याही प्रकारचे नियम न पाळतात भर धाव वेगाने वाहने चालविली जात आहेत अशी तक्रार नागरिक करीत आहेत.
त्यातच आता महामार्गावर गटार तयार करण्याचे काम ही सुरू केले आहे. अशा वेळी ही विरुद्ध दिशेने येताना अगदी मध्येच येतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. विरुद्ध दिशेने वाहतूक करणारी आरएमसी वाहने व अन्य मोठे डंपर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विरुद्ध दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात कारवाई केली जाते असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वाहतूक) प्रशांत लांगी यांनी सांगितले आहे.
सरळ मार्गी प्रवासाचा कंटाळा
प्रत्येक वाहनांना ये जा करण्यासाठी मालजीपाडा, नायगाव, ससूनवघर अशा ठिकाणी उड्डाणपूल तयार केले आहेत.
मात्र त्याला वळसा घालून प्रवास करण्याचा कंटाळा आरएमसी व इतर मातीभराव करणारे वाहनचालक करतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
