Mumbai Ahmedabad Highway / वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एकापाठोपाठ एक अशा अपघाताच्या घटना समोर येत आहेत. शुक्रवारी सायंकाळी सातीवली पुलावर चारचाकी वाहनाची दुचाकी धडक लागून भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यात दोन्ही वाहने आगीत जळून खाक झाली आहेत.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच गुजरात सारख्या परराज्याला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या महामार्गावरून हलक्या तसेच अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु असते. पण, अलीकडच्या काळात जुनी झालेली वाहने, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून चालवली जाणारी वाहने यामुळे वाहनांच्या अपघातात वाढ झाली असताना. आता यात वाहनांना आग लागण्याच्या घटनांची देखील भर पडली आहे. एकाच आठवड्यात वाहनांना आगी लागण्याच्या सलग तीन घटना घडल्या आहेत. ज्यात दोन अवजड वाहने, एक दुचाकी आणि चारचाकी अशी चार वाहने जाळून खाक झाली आहेत.

या महामार्गावरील सातीवली येथील पुलावर इनोव्हा गाडीने एका दुचाकी वाहनाला धडक दिली. या धडके नंतर अचानक दोन्ही वाहनांची पेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. शॉट सर्किट झाल्याने ही आग लागली असावी अंदाज व्यक्त केला जात आहे.

एकाच दिवशी दोन वाहनांना आग

२२ डिसेंबर २०२५ – सोमवारी रेतीच्या गोण्याने भरलेले डीडी ०१/ सी ९६९० या क्रमांकाचे वाहन मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र, वाहनात तांत्रिक बिघाड होऊन अचानकपणे आग लागली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले.

२२ डिसेंबर २०२५ – तर सोमवारी दुपारच्या सुमारास महामार्गावर अजून एक चालत्या वाहनाला आग लागल्याची घटना घडली. दुसऱ्या घटनेत विरार खानिवडे टोल नाक्याच्या काही अंतरावर असलेल्या सातीवली येथे एका टेम्पोला आग लागली होती.यात नर्सरीमधील झाडे, शेण व अन्य साहित्य होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.