वसई :- वसई-विरार शहरात शनिवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला बसला असून, महामार्गावरील वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

​मुसळधार पावसामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. विशेषतः जेके टायर जवळील मुंबई वाहिनी आणि गुजरात वाहिनी या दोन्ही बाजूंनी रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहत आहेत. रस्त्याला नदीचे स्वरूप आल्यामुळे दोन्ही वाहिन्यांवरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.

​वर्सोवा पुलापासून ते विरार फाटा या दरम्यान ससूपाडा, मालजीपाडा, चिंचोटी, पेल्हार आणि वसई फाट्याजवळ अशा विविध ठिकाणी महामार्गावर पाणी साचू लागल्याने वाहतुकीवर त्याचा गंभीर परिणाम झाला असून, मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

​पावसाळ्यापूर्वी महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या उपाययोजना पूर्णपणे अपुऱ्या असल्याचे या परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे. महामार्गालगत अनेक ठिकाणी गटार बांधणीची कामे अजूनही अपूर्ण अवस्थेत आहेत. परिणामी, डोंगरमाथ्यावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे. प्राधिकरणाच्या या ढिसाळ नियोजनामुळे हजारो वाहनचालकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.