वसई: मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मनोरी येथे नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामुळे पारंपरिक मच्छीमारांचा व्यवसाय धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त करत स्थानिक रहिवासी तसेच मच्छीमार व कोळी संघटनांनी या प्रकल्पास तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच पालिकेने हा प्रकल्प रद्द करावा म्हणून १९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.
वाढत्या नागरीकरणासह मुंबई शहरातील पाण्याची मागणीही वाढत आहे. त्यामुळे पाण्याची गरज भागवण्यासाठी व पाऊस तसेच तलावांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मनोरी येथे ४०० एमएलडी निःक्षारीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या प्रकल्पामुळे मच्छीमारांच्या पारंपरिक व्यवसायावर होणारा परिणाम लक्षात घेता, स्थानिक नागरिक आणि मच्छीमार संघटनांकडून प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर गोऱाई, मनोरी, पाली, मालवणी, उत्तन, मुंबई आणि उरण येथील मच्छीमार, शेतकरी तसेच किनारपट्टी भागातील नागरिकांच्या प्रतिनिधींची २६ सप्टेंबर रोजी गोऱाई मल्टिपर्पज हॉल येथे बैठक पार पडली. या बैठकीत प्रस्तावित मनोरी–गोऱाई समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पामुळे किनारी परिसंस्था, पारंपरिक मासेमारी आणि स्थानिक कोळी समाजाच्या उपजीविकेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रस्तावित ४०० एमएलडी क्षमतेच्या समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात समुद्राचे पाणी खेचणे तसेच त्यातून निर्माण होणारे अतिक्षारयुक्त पाणी अरबी समुद्रात सोडणे, या बाबींवर बैठकीत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. या प्रक्रियेमुळे समुद्री जैवविविधता, माशांची प्रजनन व संगोपन क्षेत्रे, मासेमारीची पारंपरिक ठिकाणे तसेच मच्छीमारांच्या उपजीविकेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांवर चर्चा झाली. चेन्नई येथील समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पांच्या अनुभवातून समोर आलेल्या पर्यावरणीय चिंतांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रकल्प प्रस्तावकाने एमसीझेडएमए समोर सादर केलेली कागदपत्रे व माहितीबाबतही बैठकीत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्रभावित मच्छीमार व स्थानिक नागरिकांच्या प्रत्यक्ष परिस्थितीचे आणि चिंतांचे प्रतिबिंब या सादरीकरणामध्ये पुरेशा प्रमाणात दिसून येते का, याची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच संबंधित परवानग्या व एनओसीमधील अटींकडे विशेष लक्ष वेधण्यात आले.
कोळी समाजासाठी समुद्र हा केवळ उपजीविकेचे साधन नसून आमचा वारसा, संस्कृती, ओळख आणि अस्तित्वाचा आधार आहे. आमचा समुद्र, आमची उपजीविका आणि आमची ओळख वाचवण्यासाठी आम्ही या प्रकल्पाला ठाम विरोध करत राहणार असल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष व उत्तन येथील रहिवासी बर्नार्ड डी’मेलो यांनी सांगितले. तर १९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील मच्छीमार आणि किनारी भागातील नागरिक गोऱाई क्षारनिर्मूलन प्रकल्प रद्द करण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती गोऱाई व्हिलेजर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष स्विटी हेन्रिक्स यांनी दिली.
या बैठकीस गोऱाई व्हिलेजर्स वेल्फेअर असोसिएशन अध्यक्ष स्विटी हेन्रिक्स, नगरसेविका शर्मिला बागाजी, माजी नगरसेवक बर्नार्ड डी’मेलो, गोऱाई मच्छीमार सोसायटी अध्यक्ष ओल्डिन वसाईकर अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अध्यक्ष देवेंद्र तांडेल, राजाराम पाटील; मनोज माशेलकर; हेमंत कोळी; डेनिस डिसोझा पाली उत्तन मच्छिमार सहकारी सोसायटीचे सचिव आल्सन निग्रेल लिंटन मुनीस तसेच धारावी बेटावरील स्थानिक नागरिक उपस्थित होते.
