भाईंदर : मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या क्रिकेटपटूंना उत्तम सराव करता यावा, यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने मिरा-भाईंदर महापालिकेकडे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रस्ताव अद्याप प्रलंबितच राहिला आहे.मिरा-भाईंदर शहर हे मुंबईलगत वसलेले शहर असून येथील लोकसंख्या साधारण १५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. शहराला स्वतंत्र महानगरपालिका असली तरी येथे क्रिकेट खेळण्यासाठी आवश्यक मैदान व प्रशिक्षण केंद्रांची कमतरता आहे. त्यामुळे येथील मुलांना नाईलाजाने दोन ते तीन तासांचा प्रवास करून मुंबईतील शिवाजी पार्क,आझाद मैदान आणि ओव्हल मैदान येथे जावे लागत आहे. यामुळे मुलांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाया जात असून त्यांच्या खेळावरही गंभीर परिणाम होत आहे.

यासाठी मिरा-भाईंदर शहरात स्वतंत्र क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे शहरात प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे ठरविण्यात आले. याकरिता चार वर्षांपूर्वी भाईंदर पूर्व येथील बाळासाहेब ठाकरे मैदान येथे हे केंद्र उभारण्यास मान्यता द्यावी, असे पत्र असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी आयुक्तांना पाठवले होते. मैदान महानगरपालिकेने उपलब्ध करून दिल्यास त्याच्या देखरेख व दुरुस्तीचा संपूर्ण खर्च असोसिएशनमार्फत करण्यात येईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले होते.

मात्र, क्रिकेट असोसिएशनला जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव महासभेपुढे आला असता त्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी निदर्शनास आणण्यात आल्या. तसेच शहरातील इतर तीन मैदानांची पाहणी करून पालिकेने योग्य अहवाल सादर करावा, असे मत सत्ताधारी भाजप पक्षाने मांडले होते. मात्र, विरोधी पक्षातील राजकीय नेत्याच्या पुढाकारातून हा निर्णय होत असल्यामुळे त्यावेळी जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आल्याची चर्चा आहे.मुंबई क्रिकेट असोसिएशनने मागणी करून तब्बल पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला असला, तरी क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारण्यासंदर्भात कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने क्रिकेटपटूंमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमके काय होणार :

मिरा-भाईंदर महानगरपालिकेने मुंबई क्रिकेट असोसिएशनला जागा उपलब्ध करून दिल्यास, असोसिएशनमार्फत शहरात सीझन क्रिकेट पीच उभारण्यात येणार आहेत. त्यानंतर असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या माजी क्रिकेटपटूंकडून नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे क्रिकेट क्षेत्रात नाव कमावू इच्छिणाऱ्या तरुणांना मोठी संधी उपलब्ध होणार असून शहराचेही नाव मोठे होईल, असा दावा प्रताप सरनाईक यांनी केला आहे.मात्र, क्रिकेट असोसिएशनला जागा उपलब्ध करून दिल्यास अन्य खेळांसाठी महापालिकेकडे पुरेशी जागा उपलब्ध राहणार नाही, अशीही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शहरातील मैदानांचा वापर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने त्यांची गैरसोय होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. परिणामी, व्यापक दृष्टिकोनातून प्रशासनाकडून या प्रस्तावाकडे सावध भूमिका घेतली जात असल्याचे बोलले जात आहे.