वसई: मुंबईच्या वेशीवर निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दहिसर टोलनाका स्थलांतरित केला जाणार आहे.याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला प्रस्ताव सादर केला होता. मात्र स्थलांतराचा प्रस्ताव MoRTH टोल शुल्क नियमांनुसार नसल्याने तो फेटाळून लावला आहे.
मुंबईच्या वेशीवरील दहिसर पथकर नाक्यामुळे वाहतूक कोंडीची तीव्र समस्या निर्माण होत आहे. या समस्येचा फटका मुंबई, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि ठाणे या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना बसतो. यासाठी टोल नाका स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्याच अनुषंगाने प्रयत्न सुरू केले आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वर्सोवा पुलापलीकडच्या भागात पथकर नाका स्थलांतरित करण्याची परवानगी मिळावी असा प्रस्ताव दिला होता. मात्र वर्सोवा पुलाकडे टोल नाका स्थलांतरित करण्यास तेथील स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. तर ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) जीत मशरु यांनी सुद्धा ही टोल नाका स्थलांतर झाल्यास नेमक्या काय समस्या निर्माण होऊ शकतात असे प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिले आहे. आधीच राष्ट्रीय महामार्ग वाहतूक कोंडीत सापडत आहे. वसईकडे स्थलांतरित झाल्यास कोंडी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. याचा फटका मिरा भाईंदर आणि ठाणे या भागातील नागरिकांना बसू शकतो. त्यालाच उत्तर देतान ३० ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचा विकास आणि व्यवस्थापन करणाऱ्या एनएचएआयच्या मुंबई कार्यालयाने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केले, स्थलांतराचा प्रस्ताव MoRTH टोल शुल्क नियमांनुसार नसल्याने त्याला आम्ही मान्यता दिली असून तसे रस्ते विकास महामंडळाला कळविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दहसिर तूर्तास दहिसर टोल नाका स्थलांतरित करण्याला ब्रेक लागला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जागेचा पेच कायम
दहिसर पथकर नाका वसई-विरार मार्गावरील वर्सोवा खाडी पुलापुढे स्थलांतरित करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, हा पथकर नाका या मार्गावर हलवल्यास भविष्यात वाहतूक कोंडीसह अनेक समस्या उद्भवतील, असा आक्षेप स्थानिक ग्रामस्थांकडून नोंदविण्यात आला आहे.तसेच भाजपचे वरिष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनीही ही जागा वनविभागाच्या मालकीची असल्याने येथे पथकर नाका उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.त्यामुळे ८ नोव्हेंबर रोजी हा पथकर नाका नेमका कुठे स्थलांतरित होणार याबाबत ही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
