Mumbai Dahisar Toll Plaza : ओवळा माजीवडा आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे दहिसर पथकर नाका चर्चेचा विषय ठरला आहे. तर वसईत झालेल्या दौऱ्यानंतर पथकर नाका स्थलांतरित न झाल्यास शिवसेना शैलीत आंदोलन करून तो स्थलांतरित केला जाईल अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
त्यानुसार रविवार मध्यरात्रीपासून दहिसर पथकर नाका स्थलांतरणाच्या कामाला ठेकेदाराकडून सुरुवात करण्यात आली. ज्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण, इतक्या संघर्षानंतर पथकर नाका फक्त ५० मीटरच पुढे सरकल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मुंबईच्या उत्तर टोकावर असलेला दहिसर पथकर नाका आपल्या पूर्वीच्या स्थानापासून अवघ्या पन्नास मीटर पुढे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आला आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लागणार असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
दहिसर पथकर नाक्यावरील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी पथकर नाका स्थलांतरित करण्याची घोषणा मंत्री सरनाईक यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. यासाठी सुरुवातीला वर्सोवा पुलापुढील जागा निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी एमएसआरडीसी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्या होत्या.मात्र, मुंबईसाठी उभारण्यात आलेला हा पथकर नाका वसई-विरार किंवा मिरा-भाईंदरच्या हद्दीत आल्यास स्थानिकांना मोठा त्रास होईल, असा आरोप महामार्गालगतच्या गावकऱ्यांकडून करण्यात येत होता. या निर्णयाला भूमिपुत्र संघटनेने ठाम विरोध दर्शविला होता. याशिवाय भाजपनेही गावकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता.त्यामुळे पथकर नाक्याच्या स्थलांतरांचा पेच निर्माण झाला होता.
दरम्यान, १३ नोव्हेंबर रोजी पथकर नाका स्थलांतरित होणार असल्याची पुनःघोषणा सरनाईक यांनी केली होती. त्यामुळे हा पथकर नाका नेमक्या कोणत्या ठिकाणी हलवला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर हा पथकर नाका पूर्वीच्या जागेपासून वसई-विरारकडे जाणाऱ्या मार्गावर अवघ्या ५० मीटर पुढे हलवण्यात आला आहे.
गुरुवारी स्वतः सरनाईक यांनी स्थलांतरित पथकर नाक्याची पाहणी केली. यात पूर्वीप्रमाणे मोठे दुभाजक हटविण्यात आले असून अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांची हालचाल सुरळीत झाली असून वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लागल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच, मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवर रस्त्याचे रुंदीकरण करून मार्ग खुला करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी घेतला आहे. कंत्राटदाराची मुदत २०२९ पर्यंत असल्याने सर्व बाबींचा विचार करून पथकर नाका तात्पुरता स्थलांतरित करण्यात आला आहे. पुढील काळात प्रशासनाला योग्य जागा मिळाल्यानंतर हा नाका पूर्णतः स्थलांतरित केला जाईल, असे सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
प्रवाशांमध्ये मात्र निराशा
मागील दोन महिन्यांपासून दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार, अशी अपेक्षा प्रवाशांमध्ये निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात नाका केवळ ५० मीटर पुढे हलवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यकर्त्यांकडून जल्लोष
दहिसर पथकर नाका काही अंतरावर हलवण्यात आला असला तरी त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत हा नाका कायमचा स्थलांतरित होणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आश्वासन पूर्ण झाल्याचा दावा करत शिवसैनिकांनी पथकर नाक्याजवळच डोक्यावर फेटे बांधून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
