वसई: मुंबई लोकल प्रवासादरम्यान दरवाजा बंद करण्यावरून झालेला वाद आणि त्यातून झालेली एका तरुणाची अमानुष हत्या; या घटनेमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच, सोशल मीडियावर एका तरुणाने शेअर केलेली पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत असून, त्यावरून नेटकऱ्यांमध्ये नव्या चर्चेला उधाण आले आहे.
मंगळवारी चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून रोशन सुवर्णा आणि मयंक लोहार यांच्यात किरकोळ वाद झाला. मात्र, या वादाचे पर्यवसान भीषण हाणामारीत झाले. रागाच्या भरात रोशन सुवर्णा याने आपल्या बॅगेतील चाकू काढून २२ वर्षीय मयंक लोहारवर जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या मयंकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी तातडीने तपास चक्रं फिरवून आरोपी रोशन सुवर्णा याला बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चालत्या गाडीत अशी धक्कादायक घटना घडल्याने सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर, गुरुवारी एका सोशल मीडिया युझरने रेल्वे डब्यात अस्वच्छता पसरवणाऱ्या एका सहप्रवाशाचा फोटो शेअर करत आपली व्यथा मांडली. त्याच्या या पोस्टने सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
संबंधित युझरने आपल्या ८ तासांच्या रेल्वे प्रवासातील एक कटू अनुभव शेअर केला आहे. तो लिहितो:
“माझ्या ८ तासांच्या रेल्वे प्रवासात शेजारी बसलेला प्रवासी सतत काही ना काही खात होता आणि उरलेले अन्न व कचरा थेट सीटच्या खाली फेकत होता. डब्याबाहेरच कचरापेटी असतानाही त्याचे हे कृत्य सुरू होते. इतकंच नव्हे तर रात्रीच्या वेळी जेव्हा सर्व प्रवासी झोपण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्याने मोबाईलवर मोठ्या आवाजात व्हिडिओ लावून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
मला त्याला कायद्याचे आणि नागरी शिस्तीचे धडे द्यायचे होते, पण मी स्वतःला आवरले. कारण, अशा अनोळखी आणि असंस्कृत व्यक्तीला शहाणपण शिकवण्यापेक्षा स्वतः सुरक्षितपणे घरी पोहोचणे जास्त महत्त्वाचे आहे. मला कुटुंब आहे, माझी काही ध्येयं आहेत आणि भविष्याचं नियोजन आहे. आजच्या काळात प्रत्येकाने व्यावहारिक राहणे गरजेचे आहे; आपण एकटे संपूर्ण देश बदलू शकत नाही. जर आपण अशा लोकांच्या वाटेला गेलो, तर ते आपली चूक सुधारण्याऐवजी उलट भांडण उकरून काढतात आणि हिंसक बनतात.
मुंबई लोकल ट्रेनमध्ये घडलेली ताजी घटना हे याचेच एक जळजळीत उदाहरण आहे. एका तरुणाने केवळ पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून दरवाजा बंद करायला सांगितला, आणि समोरच्या माथेफिरूने चाकू काढून त्याचा जीव घेतला.
वास्तव हेच आहे की, नागरी शिस्त आणि सामाजिक भान फक्त अशाच समाजात शिकवता येते जिथे समोरच्याची ऐकून घेण्याची मानसिकता असते. त्यामुळे आजच्या जगात सर्वात शहाणपणाचा पर्याय हाच आहे की, अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवावे, शांत राहावे, अधिक पैसे कमवावे आणि आर्थिकदृष्ट्या इतके सक्षम व्हावे की जेणेकरून आपल्या कुटुंबाला अशा प्रवृत्तींपासून दूर, सुरक्षित आणि चांगल्या वातावरणात ठेवता येईल.”
सध्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, “अशा वातावरणात सामान्यांनी नक्की करायचं काय?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
