भाईंदर :- मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय घेऊन जवळपास सात वर्षे उलटून गेली असतानाही प्रकल्पाची कामे अद्याप रखडलेली आहेत. यामुळे मराठी एकीकरण समितीने तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईतील मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी स्वतंत्र मराठी भाषा भवन उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यानुसार २०१८ मध्ये मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य मंत्रिमंडळाने यास मंजुरी देऊन प्रकल्पाची घोषणा केली होती.

मात्र, भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडूनही प्रत्यक्ष कामाला गती मिळालेली नसल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीने केला आहे. सात वर्षांनंतरही भवनाचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने मराठी भाषिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

या संदर्भात मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला आहे. “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच मराठी भाषेच्या आधारावर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. अशा परिस्थितीत राज्याच्या राजधानीत मराठी भाषा भवन उभारण्यासाठी इतका विलंब का होत आहे?”असा सवाल त्यांनी केला.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महत्त्वाचा ठरणारा हा प्रकल्प अद्याप पूर्णत्वास न गेल्यास ती मराठी समाजासाठी दुर्दैवी बाब आहे , असेही देशमुख यांनी म्हटले आहे. त्यामुळे मराठी भाषा भवनाच्या उभारणीसाठी समितीकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.