भाईंदर :- मागील काही दिवसांपासून एसी आणि इतर विद्युत उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे वीजवाहिन्यांवर मोठा ताण निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्युत प्रवाहात अडथळे निर्माण होऊन वीज खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर विजेचा वापर जपून करण्याचे आवाहन अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून करण्यात आले आहे.
यंदा राज्यात उन्हाळ्याची तीव्रता अधिक राहिली. मुंबई आणि उपनगरांमध्ये वाढते शहरीकरण व उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी एसीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरात घराघरांत एसीची संख्या वाढल्याने विजेचा वापरही लक्षणीय वाढला आहे. या वाढीव भारामुळे मुंबईसह आसपासच्या भागांना वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेवरील ताण वाढून काही ठिकाणी वीजवाहिन्यांमध्ये बिघाड होण्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई, मिरा-भाईंदर, ठाणे, पालघर आणि वसई-विरार परिसरात अशा घटना मागील काही दिवसांत समोर आल्या आहेत.
त्यामुळे ग्राहकांनी विजेचा वापर संयमाने करावा, असे आवाहन अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून करण्यात आले आहे. वीजजोडणी देताना मंजूर करण्यात आलेल्या क्षमतेनुसारच वीज वापरावी. अन्यथा वीजयंत्रणेवरील ताण वाढून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे.
विजेचा वापर कसा करावा?
एअर कंडिशनरचे तापमान २४ अंशांच्या आसपास ठेवणे, पंख्याचा वापर करून थंडावा टिकवणे, सकाळी व संध्याकाळी नैसर्गिक हवेसाठी खिडक्या उघडणे, कमी ऊर्जा वापरणारी उपकरणे वापरणे तसेच वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे प्लग बंद ठेवणे, अशा उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे.फ्रिज, एअर कंडिशनर आणि इतर विद्युत उपकरणांची नियमित देखभाल केल्यास त्यांची कार्यक्षमता वाढून वीज बचत होऊ शकते, असेही कंपनीने म्हटले आहे. वीज वापरावर नियंत्रण ठेवल्यास ग्राहकांचे वीज देयक कमी होण्यास मदत होईल तसेच पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागेल, असे अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.
