वसई: गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असताना सलग तिसऱ्या दिवशीही लोकल उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. सकाळच्या सत्रात लोकल उशिरा आल्याने नेहमीपेक्षा जास्त गर्दीतून प्रवाशांना प्रवास करावा लागला.
वसई विरार शहरातून दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक मुंबई, ठाणे, दिवा आणि पालघर या शहरांमध्ये प्रवास करतात. पावसाळ्यात जलमय होणारे रस्ते आणि तासंतास होणारी वाहतूक कोंडी यामुळे अनेकजण लोकलने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र, जीवनवाहिनीचा हाच प्रवास पावसाळ्यात प्रवाशांसाठी अत्यंत धकाधकीचा ठरू लागला आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. आजही शहरात विविध ठिकाणी हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सकाळपासूनच वसई विरार शहरात पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. या पावसाचा थेट परिणाम लोकल सेवेवर झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर विरार ते चर्चगेट दरम्यान १० ते २० मिनिटे उशिराने लोकल धावत आहेत. यामुळे चाकरमानी आणि विद्यार्थ्यांना बराच ताटकळत फलाटावर उभे रहावे लागत आहे.
तसेच सकाळच्या सत्रात उशिराने येणाऱ्या लोकल आणि त्यातच वाढवलेल्या एसी लोकलमुळे प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी जमली होती. यामुळे अनेकांना नेहमीपेक्षा जास्त गर्दीतून प्रवास करावा लागला. तसेच लोकलच्या फलाटात झालेले बदल, बंद असलेले स्वयंचलित जिने यामुळे प्रवाशांना खूप धावपळ करावी लागली.
मेमूचे वेळापत्रकही कोलमडले
वसईतून दिवा आणि पनवेल या ठिकाणी कामानिमित्त जाणारे प्रवासी मेमूने दररोज प्रवास करतात. मात्र, या सेवेलाही पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले. तब्बल २० ते ३० मिनिटे उशिराने मेमू वसईत दाखल झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
