वसई: मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवानंतर मेमूलाही बसला आहे. वसई, डहाणूवरून पनवेल आणि बोरिवलीच्या दिशेने सोडण्यात येणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या असल्यामुळे लाखो प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पालघर जिल्ह्यासह वसई विरारला हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर परवापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. खासकरून विरार ते नालासोपाऱ्यादरम्यान रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे विरार ते चर्चगेट दरम्यान लोकल सेवा अर्धा ते एक तास उशिराने धावत आहे. तर चर्चगेट ते विरार दरम्यान अर्धा तास उशिराने लोकल सोडल्या जात आहेत.

तर मुंबई सेंट्रल विभागातील रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून लोकल सेवेनंतर वसई ते पनवेल, डहाणू ते पनवेल, डहाणू ते बोरिवली आणि पनवेल ते वसई दरम्यान चालवण्यात मेमू गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे डहाणू आणि वसईहून पनवेलच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी कोंडी झाली आहे. तर विरार – सुरत ही गाडी सोमवारी विरारऐवजी वलसाड येथून सोडण्यात येणार असून पुढे ती सुरतपर्यंत धावेल. म्हणजेच विरार ते वलसाड दरम्यानची गाडीची फेरी रद्द करण्यात आली आहे.

पावसाचा जोर आणि रुळांवरील पाण्याची स्थिती पाहता रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना घराबाहेर पडण्यापूर्वी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे आगाऊ नियोजन करावे आणि रेल्वे स्थानकावर येण्यापूर्वी किंवा प्रवास सुरू करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत ॲप, हेल्पलाईन किंवा सोशल मीडिया खात्यांवरून गाड्यांचे लाईव्ह स्टेटस नक्की तपासून घ्यावे, जेणेकरून स्थानकांवर होणारी गर्दी आणि मनस्ताप टाळता येईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

६९१६४ डहाणू रोड – पनवेल
६९१६५ पनवेल – वसई रोड
६९१६८ वसई रोड – पनवेल
६९१६७ पनवेल – वसई रोड
६९१६६ वसई रोड – पनवेल
६९१६१ पनवेल – डहाणू रोड
६९१७४ डहाणू रोड – बोरिवली
६९१३९ बोरिवली – वलसाड
६१००२ डोंबिवली – बोईसर