भाईंदर :- मुंबईसह उपनगरात सोमवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पश्चिम रेल्वे मार्गिकेला बसला आहे. डहाणू ते चर्चगेटदरम्यान धावणाऱ्या अनेक उपनगरी गाड्या अर्धा ते एक तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत असून विविध स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पश्चिम रेल्वे मार्गिकेवरील काही ठिकाणी वारंवार रुळांवर पाणी साचत आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा करण्याबरोबरच रुळांची देखभाल आणि दुरुस्तीची कामे रेल्वेकडून सुरू आहेत. सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने रेल्वे वाहतुकीवर त्याचा थेट परिणाम झाला.

डहाणूहून पहाटे आणि सकाळच्या वेळेत सुटणाऱ्या अनेक लोकल गाड्या संथ गतीने धावत असल्याने त्या पुढील सर्व स्थानकांवर उशिराने पोहोचत आहेत. परिणामी नालासोपारा, वसई, विरार, भाईंदर, मिरा रोड, बोरीवली आदी स्थानकांवर प्रवाशांना अर्धा ते एक तास प्रतीक्षा करावी लागत आहे. कार्यालयीन वेळ असल्याने स्थानकांवर गर्दी होऊ लागली आहे.

वसई स्थानक परिसरात यापूर्वीप्रमाणे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची समस्या काहीशी कमी झाली असली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून गाड्या संथ गतीने चालविण्यात येत आहेत. त्यामुळे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत झाले असून त्याचा परिणाम पुढील सर्व लोकल सेवांवर होत आहे. दुसरीकडे, बोरीवली ते चर्चगेटदरम्यान धावणाऱ्या काही लोकल सेवा तुलनेने नियमित वेळेनुसार सुरू असल्याचे दिसून आले.

शाळा तसेच काही खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली, तरी अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची वर्दळ कायम आहे. दरम्यान, पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून, अत्यावश्यक काम असल्याशिवाय प्रवास टाळावा, तसेच रेल्वे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.