भाईंदर : मुसळधार पावसाचा फटका पश्चिम रेल्वे मार्गिकेला सलग दुसऱ्या दिवशीही बसला आहे. डहाणू ते चर्चगेटदरम्यान धावणाऱ्या अनेक उपनगरी लोकल गाड्या सरासरी अर्धा तास उशिराने धावत असल्याने सकाळच्या कार्यालयीन वेळेत प्रवाशांचे मोठे हाल झाले. परिणामी विविध स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसून आले.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वे मार्गिकेवरील काही ठिकाणी रुळांवर पाणी साचत असल्याने रेल्वे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून गाड्या संथ गतीने चालविण्यात येत आहेत. यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही लोकल सेवेचे वेळापत्रक विस्कळीत झाले.

डहाणूहून सकाळच्या वेळेत सुटणाऱ्या अनेक लोकल गाड्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे अर्धा तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर, मिरा रोड, दहिसर, बोरीवली आदी स्थानकांवर प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. कार्यालयीन वेळ असल्याने स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

विरार,वसई, नालासोपारा या रेल्वे स्थानकावरील रुळ पाण्याखाली गेले आहेत.त्यामुळे रेल्वे प्रशासन पाण्याचा निचरा करण्याच्या दुष्टीने काम करत आहेत.तर लोकल गाड्यांचा वेग कमी ठेवण्यात येत आहे.त्यामुळे एका गाडीचा विलंब पुढील सर्व सेवांवर होत असून संपूर्ण वेळापत्रकावर त्याचा परिणाम झाला आहे. सोमवारी कामावर सुट्टी घेतल्याने मंगळवारी कामावर चाकरमान्यांची गर्दी स्थानकावर होत आहे. मात्र रेल्वे गाड्या वेळेत येत नसल्यामुळे अनेक जण तसेच माघारी परतू लागल्याचे दिसून येत आहेत.