वसई: वसई-विरार शहरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून नालासोपारा आणि वसई दरम्यान रेल्वे रुळांवर साचलेले पाणी अद्याप ओसरलेले नाही. याचा थेट फटका पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला असून सलग तिसऱ्या दिवशी रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. दररोज लाखोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आणि उपनगरातील प्रवाशांना आज पुन्हा एकदा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पश्चिम रेल्वे मार्गिकेवरील अनेक सखल भागांत रुळांवर पाणी साचले आहे. रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गाड्या अत्यंत संथ गतीने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकल सेवेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.
डहाणूहून व वसईहून सकाळच्या सत्रात सुटणाऱ्या अनेक लोकल गाड्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे अर्धा तास उशिराने धावत आहेत. ऐन कार्यालयीन वेळ असल्याने स्थानकांवर प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली.विरार, नालासोपारा, वसई रोड, नायगाव भाईंदर, मिरा रोड, दहिसर आणि बोरीवली अशा ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी होती. गाड्या वेळेवर येत नसल्याने चाकरमान्यांना स्थानकांवरच दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.
प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून व्यक्त केला रोष
वसईच्या पुढे मुंबईच्या दिशेने लोकल सेवा संथ गतीने सुरू असली, तरी विरार आणि नालासोपारा दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. विरार आणि नालासोपारा परिसरातील नागरिकांना रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्यातून जीवघेणी पायपीट करत स्थानक गाठावे लागत आहे.
लोकल गाड्या विरार आणि नालासोपारा स्थानकांपर्यंत पोहोचत नसल्याने प्रवाशांच्या संयमाचा बांध सुटला. संतप्त प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर खाली उतरून गाड्या अडवल्या आणि रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास आणि रुळांवरील पाणी न ओसरल्यास संध्याकाळी घरती परतणाऱ्या प्रवाशांचे हाल आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
