भाईंदर :-मुंबई उपनगरातील जुन्या औद्योगिक वसाहतींना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. वर्षानुवर्षे जुन्या झालेल्या कारखान्यांची दुरुस्ती, पुनर्बांधणी तसेच आधुनिक यंत्रसामग्रीच्या गरजेनुसार कारखान्यांची उंची वाढविण्यास परवानगी देण्यासाठी नियमावलीत आवश्यक बदल करण्याची तयारी शासनाने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मिरा भाईंदरमधील औद्योगिक वसाहतींची पाहणी केली.
मिरा भाईंदरमध्ये १९७५ पासून स्टील उद्योगाशी संबंधित हजारो लहान-मोठ्या औद्योगिक आस्थापना कार्यरत आहेत. शहरातील हा उद्योग देशासह परदेशातही ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत रस्त्यांची उंची वाढल्याने अनेक औद्योगिक गाळे रस्त्याच्या पातळीपेक्षा खाली गेले आहेत. तसेच जुने कारखाने आधुनिक यंत्रसामग्रीसाठी अपुरे ठरत आहेत. परिणामी दुरुस्ती, पुनर्बांधणी आणि उंची वाढविण्याच्या परवानग्यांचा प्रश्न उद्योजकांसमोर उभा राहिला आहे.
आधुनिक उद्योगांमध्ये १५ ते १७ फूट उंचीच्या हायड्रॉलिक यंत्रांचा वापर केला जात आहे. त्यामुळे औद्योगिक गाळ्यांची उंची वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मिरा भाईंदर स्टेनलेस स्टील मॅन्युफॅक्चरर अँड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मित्तल यांनी औद्योगिक गाळ्यांना मागील बाजूस २४ फूट आणि पुढील बाजूस २० फूट उंचीची परवानगी देण्याची मागणी केली.औद्योगिक वसाहतींच्या विकासासाठी सध्याच्या नियमांमध्ये आवश्यक बदल करून नवीन नियमावली करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांनी सांगितले. औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष परिस्थिती आणि उद्योजकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी पाहणी करण्यात आली असून, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
नियमावलीत बदल झाल्यास जुन्या औद्योगिक
आस्थापनांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करणे शक्य होणार आहे. तसेच आधुनिक यंत्रसामग्री बसविण्यासाठी आवश्यक उंची उपलब्ध झाल्याने उद्योगांच्या विस्ताराला चालना मिळण्याची शक्यता आहे. यामुळे मिरा-भाईंदरसह मुंबई उपनगरातील औद्योगिक वसाहतींमध्ये गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे.
