वसई – नवीन तयार करण्यात येत असलेल्या मुंबई वडोदरा महामार्गावर भरधाव दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. रस्त्यावरील माती आणि रेतीच्या ढिगाऱ्यावरून दुचाकी घसरल्याने झालेल्या या अपघातात २० वर्षीय चालकाचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेला त्याचा मित्र जखमी झाला आहे. विरार पूर्वेच्या तळ्याचापाडा गावाजवळ ही घटना घडली.

अरमान मोहम्मदमुकीम सिद्धीकी (२०) असे मयत तरुणाचे नाव असून इरफान अब्दुल कादीर खान ( २४) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दोघेही नालासोपारा वाकणपाडा येथील रहिवासी असून सोमवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दुचाकी (एम एच ४८, डी एच ४८४८) घेऊन
नवीन एक्सप्रेसवेवर फिरण्यासाठी गेला होता. खार्डी गाव ते कोपरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर अरमानने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत बेदरकारपणे आणि भरधाव वेगात दुचाकी चालवली. तळ्याचा पाडा गावाजवळ रस्त्यावर साचलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून दुचाकी अचानक स्लिप झाली. यामुळे दोघेही रस्त्यावर जोरात कोसळले या अपघातात अरमानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर इरफानच्या हाता-पायाला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा महामार्गावर अजूनही खुला झाला नाही. मात्र तेथील कामागार व साहित्य वाहतूक करण्यासाठी जो रस्ता ठेवला आहे. त्या ठिकाणाहून काही जण वाहने घेऊन जात आहेत. मुंबई वडोदरा महामार्ग अजूनही अधिकृत रित्या खुला झाला नसला तरी जो तेथील कामगार व साहित्य वाहतुकीला खुल्या असलेल्या भागातून आजूबाजूच्या भागातील  वाहनचालक या मार्गावर वरून प्रवास करू लागले आहे. विशेषतः रस्ता मोकळा असल्याने अनेक वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवितात त्यामुळे अपघाताच्या घटना समोर येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी सांगितले आहे.

जुन महिन्यात पालघर मानपाडा – खारेकुरण येथील रहिवासी आकाश ठाकूर या सिव्हिल इंजिनिअरचा अपघाती मृत्यू झाला होता.