वसई: टाळ मृदुंगांच्या निनादात पंढरपूरच्या दिशेने निघालेली विठ्ठलाची वारी सर्वांनाच वेड लावते. तर वसईतील काही ख्रिस्ती तरुणांना देखील यंदा या वारीने भुरळ घातली. पारंपरिक पेहराव करत आणि विठ्ठलाच्या नावाचा जयघोष करत वारीत सहभागी या तरुणांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला आहे.
आषाढ महिना सुरू होताच वारकऱ्यांची पावले आपोआपच पंढरपूरच्या दिशेने वळू लागतात. विठ्ठल रखुमाईच्या नावाचा गजर करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपुरात दाखल होतात. तर वर्षानुवर्षे चालत आलेल्या या वारीची भुरळ वसईतील ख्रिस्ती तरुणांनाही यंदा पडली. गंधकाचा टिळा, पारंपरिक पेहराव आणि गळ्यात भजनी टाळ घालून वसईतील तरुण वारीत सहभागी झाले.
वसईतील वकील, तथा जिल्हा वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड. जॉर्ज फरगोस यांच्या संकल्पनेतून वारी सहभागाच्या कल्पनेस मूर्त स्वरूप प्राप्त झाले. ॲड. जॉर्ज यांची ही संकल्पना ॲड. अजय परेरा, ॲड. अविश फरेरा, ॲड. प्रीतेश देशमुख, ॲड. सुयश ठाकूर आणि ॲड. हर्षल राऊत या वकील मित्रांनी उचलून धरली. या सर्वांनी वारकऱ्यांचा वेश परिधान करून दिवे घाट ते सासवडपर्यंत असे सुमारे १० कि.मी. अंतर वारीत चालत सहभाग घेतला.
या अनुभवाबाबत बोलताना ॲड. जॉर्ज फरगोस म्हणाले की, “वारी म्हणजे भक्ती, समता, प्रेम आणि सेवाभाव यांचा अखंड प्रवाह. अनेक वारकरी मोठ्या भक्तीभावाने त्यामध्ये सहभागी होत असतात. माझे ज्येष्ठ सहकारी आणि मित्र ॲड. सिद्धेश नाईक हे दरवर्षी वारीत सहभागी होत असतात. ती एक प्रेरणा होतीच आणि विशेष म्हणजे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून वारकरी संप्रदायाचा प्रसार करून त्याला जनमानसात अधिक दृढ केले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे परिवर्तनवादी पुरोगामी विचार मला नित्य प्रभावित करतात. मलाही या ८०० वर्षापासून अखंडित सुरू असलेल्या परंपरेचा अनुभव घ्यायचा होता. पंढरीची वारी हा फक्त प्रवास नव्हता, तर मनाला लाभलेला आत्मिक स्पर्श होता. चंद्रभागेचा किनारा, टाळ-मृदुंगाचा नाद आणि डोळ्यांत समाधान, वारीने आयुष्यभर जपावी, अशी शिदोरी दिली.
