वसई: मागील काही वर्षांपासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गासह वसई विरार शहरातील अंतर्गत रस्त्यावर, मोकळ्या जागेत राडारोडा आणून टाकण्याचे प्रकार वाढले आहे. विशेषतः मुंबईच्या भागातून अशी वाहने शहरात राडारोडा आणून टाकत आहेत. नुकताच विलेपार्ले मुंबई येथील बांधकामाचा राडारोडा वसई चिंचोटी येथील रस्तावर टाकणाऱ्या वाहनाला वाहतूक पोलिसांनी रंगेहाथ पकडून तीन जणांच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई यासह अन्य ठिकाणी इमारतींचा पुनर्विकास व अन्य विकास कामे झपाट्याने सुरू आहेत. त्यामुळे खोदकाम, जुनी बांधकामे तोडणे त्यामुळे मोठ्या प्रमाणात राडारोडा बाहेर निघत आहे. या राडारोड्याची विल्हेवाट लावण्याऐवजी थेट मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई विरार शहराच्या हद्दीत आणून टाकला जात आहे. छुप्या मार्गाने मुंबई व अन्य भागातील राडारोड्याने भरलेली वाहने महामार्गालगत खाली केली जात आहेत. वर्सोवा पुलापासून ससूनवघर, मालजीपाडा, चिंचोटी, नायगाव, सातीवली फाटा, पेल्हार, विरार अशा विविध ठिकाणी हा राडा रोडा टाकून दिला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास मुंबई विलेपार्ले येथून आणलेला इमारतीच्या बांधकामाचा राडा रोडा बापाणे ते चिंचोटी दरम्यान महामार्गावर हायवा ट्रक (एम एच ५८ बी ८९३१) खाली केला जात होता. ही बाब वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास येताच नायगाव पोलिसांना बोलावून तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. यात चालक वीरेंद्रकुमार सहानी (३०) ट्रक मालक ज्ञानेश्वर आमोगे आणि ज्या ठिकाणहून हा राडारोडा भरला तेथील सद्दाम नावाचा व्यक्ती अशा तीन जणांवर नायगाव पोलीस ठाण्यात सार्वजनिक रस्त्याचे विद्रुपीकरण व महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी मे महिन्यात चिंचोटी येथे रात्रीच्या सुमारास राडारोडा खाली करत असताना नायगाव पोलिसांनी कारवाई केली होती.

महापालिकेच्या कारवाईच्या घोषणा हवेतच…

वसई विरार शहरात अन्य शहरातील राडारोडा आणून टाकण्याचे प्रकार सर्रास पणे सुरू आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहराच्या वेशीवरच पथके नेमून कारवाई केली जाईल अशी घोषणा केली होती. मात्र महापालिकेकडून अजूनही ठोस कारवाई केली जात नाही त्यामुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीवरच आता नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केले जात आहे. महापालिका, पोलीस, महामार्ग प्राधिकरण, महसूल अशा सर्वच विभागाने एकत्र येऊन संयुक्त मोहीम राबावावी अशी मागणी ही नागरिक करीत आहेत.