वसई: मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली लोकलसेवा अखेर पूर्वपदावर आली आहे. विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते विरार लोकल चालवल्या जात आहेत. मात्र, वेळापत्रकातील काही लोकल गाड्यांच्या डब्यांच्या रचनेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने बदल केल्यामुळे प्रवाशांची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आहे. वसई विरार शहरात कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील विविध भागात पाणी साचले होते.

यामुळे शहरांतर्गत वाहतूक सेवा तर ठप्प झालीच होती. मात्र, लोकल सेवेवरदेखील याचा परिणाम दिसून आला. वसईतील फलाट क्रमांक एकसह नालासोपारा आणि विरारमधील रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे चर्चगेट ते विरार लोकल सेवा विस्कळीत झाली होती. वसईपर्यंतच लोकल सेवा सुरू असल्यामुळे नालासोपारा आणि विरारमधील रहिवाशांना रेल्वे रुळावरून पायी चालत घर गाठावे लागत होते.

मात्र, बुधवारी या पावसाने काहीशी उसंत घेतली असून यामुळे शहरातील बहुतांश भागातील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तर रेल्वे रुळावरील पाणीही आता ओसरल्यामुळे चार ते पाच दिवसांनी लोकल सेवा पूर्ववत झाली आहे. यामुळे नागरिकांना विरार ते चर्चगेट सुरळीत प्रवास करता येत आहे.
मात्र, लोकल सेवा रुळावर आली असली तरी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने तांत्रिक कारणास्तव काही उपनगरीय लोकल फेऱ्या १५ डब्यांऐवजी १२ डब्यांच्या रेकसह चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

यात अप आणि डाऊन मार्गावर धावणाऱ्या एकूण १४ लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. डब्यांची संख्या कमी झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

प्रभावित झालेल्या १४ लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक

अप लोकल – चर्चगेट/दादर/अंधेरीकडे जाणाऱ्या)
|९२०२२ | धीमी | नालासोपारा | ०६:३३ | अंधेरी | ०७:२६ |
|९२०५२ | धीमी | विरार | ०८:४४ | भाईंदर | ०९:२४ |
|९२०७४ | धीमी | विरार | १०:०४ | अंधेरी | ११:०० |
|९२०९८ | धीमी | विरार | १२:०९ | भाईंदर | १२:४५ |
|९२११८ | जलद | विरार | १३:५२ | अंधेरी | १४:४५ |
|९२१४० | जलद | विरार | १५:५२ | अंधेरी | १६:४४ |
|९२१६४ | जलद | विरार | १८:११ | दादर | १९:११ |
डाऊन लोकल – विरारकडे जाणाऱ्या
|९२०३३ | धीमी | अंधेरी | ०७:४१ | विरार | ०८:३९ |
|९२०५५ | धीमी | भाईंदर | ०९:२७ | विरार | १०:०१ |
|९२०८१ | धीमी | अंधेरी | ११:०५ | विरार | १२:०२ |
|९२१०१ | धीमी | भाईंदर | १३:०१ | विरार | १३:४० |
|९२१२३ | धीमी | अंधेरी | १४:५० | विरार (जलद) | १५:४१ |
|९२१४५ | धीमी | अंधेरी | १६:५६ | विरार (जलद) | १७:५३ |
|९२१७९ | धीमी | दादर | १९:२३ | विरार (जलद) | २०:३४ |