पोलिसांच्या मदतीने प्लास्टिकची तस्करी रोखणार

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दैनंदिन कारवाईबरोबर प्लास्टिकची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात प्लास्टिकबंदी लागू केली होती. त्यासाठी कारवाईचे निर्देश महापालिकांना दिले होते. करोनामुळे शहरात पुन्हा प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला होता. त्यामुळे आता आयुक्तांनी शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत आयुक्त दिलीप ढोले यांनी सर्व प्रभागात प्लास्टिकविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.

गुजरातमधून प्लास्टिकची तस्करी

प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधात कारवाई सुरू करून प्लास्टिक जप्त केले जात असले तरी गुजरातमधून छुप्या मार्गाने शहरात प्लास्टिकच्या पिशव्या आणल्या जात आहेत. त्यामुळे पालिकेने या विक्रेत्यांकडे येणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांची आवक रोखण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून वाहनांतून तस्करी करून प्लास्टिकच्या पिशव्या आणल्या जात आहेत. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने ही तस्करी रोखली जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांनी दिली.

शहराला प्लास्टिकमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्लास्टिकबंदीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दिलीप ढोले, आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका