भाईंदर :-मिरा रोड येथे रहदारीच्या रस्त्यावर जीव घेणे खड्डे पडल्याचे दिसून येत आहे.यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होऊन दुर्घटना घडण्याची भीती आहे. मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्षपणा करत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मिरा रोड येथील बेव्हरली पार्क परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी नव्यानेच दिवाणी व सत्र न्यायालय सुरू झाले असून, दाट लोकवस्तीमुळे वाहतुकीचीही मोठी गर्दी असते. त्यामुळे वर्षभरापूर्वी महापालिकेने येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण केले होते. मात्र, सध्या या रस्त्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा तयार झाल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे, या खड्ड्याच्या खाली महापालिकेच्या पाण्याचा नळ आहे. त्यामुळे त्या ठिकाणी झाकण असणे अत्यावश्यक होते. मात्र, वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे झाकण तुटले असून त्याठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत किरकोळ अपघातही झाले आहेत.
खड्डा स्पष्टपणे दिसावा यासाठी काही नागरिकांनी त्यात लाकडी काठी व कपड्याची पिशवी ठेवून इशारा दिला आहे. मात्र, बराच कालावधी उलटूनही महापालिकेने या ठिकाणी झाकण बसवलेले नाही, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.
झाकणे बदलण्याकडे दुर्लक्ष
मिरा-भाईंदर शहरात नाल्यांवर व रस्त्यांवर झाकण बसवण्यासाठी महापालिकेकडून कंत्राटदारांची निवड केली जाते. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात आणि अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूदही केली जाते. तरीही शहरातील अनेक भागांमध्ये झाकणे मोडकळीस आलेली किंवा गायब असल्याचे आढळते. यामुळे विशेषतः पावसाळ्यात अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
” शहरातील खड्डे भरून घेण्याचे सक्त आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी देखील खड्ड्याची माहिती द्यावी म्हणून टोल फ्री क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे. जर एखाद्या ठिकाणी खड्ड्याची समस्या जाणवत असेल तर त्याठिकाणी लवकरच सुधारणा आणली जाईल. “– राधा बिनोद शर्मा- आयुक्त मिरा भाईंदर महानगरपालिका