अनधिकृत फेरीवाले आढळल्यास प्रभाग अधिकाऱ्यांवर कारवाई

भाईंदर : शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पालिका आयुक्त स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. बुधवारी आयुक्तांनी स्वत: कारवाईत भाग घेतला. या वेळी फेरीवाल्यांना हटवून दुकानाबाहेरील अतिक्रमणे हटविण्यात आली. फेरीवाले दिसले तर प्रभाग अधिकाऱ्यांना निलंबित केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. आयुक्तांच्या या पवित्र्यामुळे फेरीवाल्यांबरोबरच पालिका अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे.

मीरा-भाईंदर शहरात फेरीवाल्यांमुळे समस्या वाढल्या आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसविले आहे. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून नागरिकांना चालणेदेखील मुश्कील होऊ लागले आहे. फेरीवाल्यांवर पालिकेच्या प्रभाग समितीकडून कारवाई करण्यासाठी चालढकल करण्यात येत होती. त्यामुळे पालिका आयुक्त दिलीप ढोले हे बुधवारी स्वत: कारवाईसाठी रस्त्यावर उतरले. पालिकेचा अतिक्रमणविरोधी फौजफाटा घेऊन ते रस्त्यावर आल्याने फेरीवाल्यांची धावपळ झाली. या वेळी अनेक दुकानदारांनी दुकानाबाहेर पत्रे लावून अतिक्रमण केल्याचे दिसून आले.  या सर्वाना तात्काळ हे पत्रे हटविण्याचे आदेश दिले. पदपथावरील फेरीवाले हटवून पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पालिकेने दोन वर्षांपूर्वी फेरीवाला सर्वेक्षण करून फेरीवाला धोरण निश्चित केले होते. मात्र या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नसल्याचे आयुक्तांना दिसून आले. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. यापुढे अनधिकृत फेरीवाले वाढले तर त्यासाठी स्थानिक प्रभाग समिती अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येऊन निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशी ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.