scorecardresearch

अग्निसुरक्षा लेखापरीक्षणाला पालिकेची सुरूवात;नोटिसा बजावल्या पण कारवाई संथ गतीने

वसई विरार शहरातील अग्निसुरक्षा लेखापरीक्षण प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. पालिकेने २० हजारांहून अधिक आस्थापनांना अग्निसुरक्षा लेखापरीक्षणांच्या नोटिशी बजावल्या आहेत.

विरार : वसई विरार शहरातील अग्निसुरक्षा लेखापरीक्षण प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. पालिकेने २० हजारांहून अधिक आस्थापनांना अग्निसुरक्षा लेखापरीक्षणांच्या नोटिशी बजावल्या आहेत. परंतु आतापर्यंत केवळ ५९७ आस्थापनांचे लेखा परीक्षण पूर्ण झाले आहे. हे प्रमाण फक्त २.९३ टक्के आहे. शहराला आगीचा धोका कायम आहे. शहरातील अग्निसुरक्षेचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गंभीर बनला होता. करोना काळानंतर सर्वच शाळा, महाविद्यालय, रुग्णालये, औद्योगिक वसाहती, सिनेमागृह, मॉल्स पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. सार्वजनिक आणि गर्दीची ठिकाणे असणाऱ्या आस्थापनांचे अग्नीसुरक्षा लेखापरीक्षण तातडीने करणे आवश्यक असताना पालिकेने केवळ नोटिसा पाठवण्यावर भर दिलेला आहे. ‘लोकसत्ता’ने ही गोष्ट बातम्यांद्वारे मांडली होती. आता पालिकेने अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्यास सुरुवात केली आहे.
पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३५ शाळा, महाविद्यालये, २३३ रुग्णालये, १७१ औद्योगिक कारखाने, वसाहते आणि १५८ उपाहारगृह अशा एकूण ५९७ आस्थापनांचे लेखापरीक्षण पूर्ण केले आहे. पालिकेने सन २०२१-२२ मध्ये सुमारे वीस हजार तीनशे आठ आस्थापनांना नोटिशी बजावल्या होत्या. त्यातील केवळ २.९३ टक्के आस्थापनांनी आपले लेखापरीक्षण पूर्ण केले आहे. शहरातील हजारो आस्थापने आजही अग्नीसंकटाच्या सावटाखाली वावरत आहेत.
पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील चार वर्षांत शहरात आगीच्या तीन हजार
घटना घडल्या आहेत. सन २०१७ मध्ये ६८६, सन २०१८ मध्ये ८१९, सन २०१९ मध्ये ८०३, सन २०२० मध्ये ६५९ आगी लागल्या होत्या.
तर २०२१ -२२चा अहवाल
हाती आला नाही. इतक्या मोठय़ा प्रमाणात आगीच्या घटना होत असताना पालिका नोटीशी बजावण्यापलिकडे नसल्याची टीका होत आहे.
आगीचा धोका कायम
• पालिकेने अग्निसुरक्षा लेखापरीक्षणास सुरुवात केली असली तरी अद्याप खासगी शिकवणी वर्ग, सिनेमागृह, मॉल्स यांचे लेखापरीक्षण झालेले नाही. उन्हाळय़ात शॉर्टसर्किटमुळे आगी लागण्याचे प्रमाण वाढत असताना शहराला असलेला आगीचा धोका त्यामुळे कायम आहे. मात्र ज्या आस्थापनांनी अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्याची तसदी घेतलेली नाही, त्यांच्यावर पालिका कारवाई करत नाही. पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून अग्नी सुरक्षा सप्ताह सुरू आहे. त्यातील विविध उपक्रमांतर्गत नागरिकांना आगीपासून जीव वाचवण्याचे धडे दिले जात आहे. पण मुळातच आग लागू नये, यासाठी काळजी घेण्यातच करण्यात प्रशासन कमी पडत आहे.
शहरातील अनेक आस्थापनांचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षणासाठी अर्ज आले आहेत. परंतु करोनाकाळात लेखापरीक्षण होऊ शकले नाही. आता सर्व प्रभाग समिती स्तरावर याचे लेखापरीक्षणाचे काम सुरू केले आहे. ते लवकरच पूर्ण होईल. – दिलीप पालव, मुख्य अग्निशमन अधिकारी, वसई विरार महापालिका

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Municipal corporation fire safety audit notices issued action vasai virar city amy

ताज्या बातम्या