भाईंदर: काही दिवसापूर्वीच उद्योगपती आनंद  महेंद्रा यांनी तोंड भरून कौतुक केलेल्या भाईंदर मधील अहिंसा चॅरिटेबल ट्रस्ट या पशु- पक्षी उपचार केंद्राला महापालिकेने नोटीस बजावली आहे. प्राण्यांवर योग्य उपचार केले जात नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

भाईंदर पश्चिम येथील उड्डाण पुलाखाली महापालिकेने पशु-पक्षी उपचार केंद्र  उभारले आहे. हे केंद्र चालवण्याची जबाबदारी अहिंसा चॅरिटेबल  संस्थेवर सोपवण्यात आली आहे.याबाबत महापालिकेने २०२३ साली संस्थेसोबत करार केला आहे. त्यानुसार मागील दीड वर्षांपासून या संस्थेमार्फत जखमी तसेच आजारी पशु-पक्षांवर उपचार केले जात आहे.  या केंद्राच्या कामाची प्रशंसा  करणारा मजकूर काही दिवसापूर्वीच  उद्योगपती आनंद महेंद्रा यांनी आपल्या ‘एक्स’ या समाजमाध्यमावर प्रसिद्ध केला होता.

हेही वाचा >>>तुरूंगात मैत्री, नालासोपार्‍यात चोरी; ६ महिन्यानंतर लागला चोरीचा छडा

मात्र आता या केंद्राच्या कामकाजात गोंधळ उडत असल्याची बाब समोर आली आहे. नुकतेच ७ जानेवारी २०२५ रोजी महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित यांनी संस्थेला नोटीस बजावली आहे. यात केंद्रात पदवीधर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक न करणे, कबुतर वगळता अन्य प्राण्यांवर उपचार न करणे,बेवारस उपचार घेणाऱ्या जनावरांची माहिती पशु संवर्धन विभागाला न देणे,मनाई आदेश असताना देखील केंद्रात मूर्ती स्थपणा करणे आणि सदर वास्तूचा खासगी कार्यक्रमासाठी वापर करणे अशा गोष्टींचा त्यात समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणी संस्थेसोबत करण्यात आलेला करार रद्द का करू नये? किंवा समाधान कारक उत्तर तात्काळ सादर करण्याच्या सुचना या नोटीस मध्ये देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>>वसई-भाईंदरमध्ये महिला असुरक्षित, महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात १५५ ने वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काम सुरळीत सुरु असल्याचा संस्थेचा दावा

भाईंदरच्या पशु -पक्षी उपचार केंद्रात सर्व काम सुरळीत पणे सुरु आहे.यात दररोज अनेक मोकाट प्राण्यांवर उपचार केले जात आहेत. यापूर्वी ही माहिती देण्याचे आदेश नव्हते. त्यामुळे आम्ही ते प्रशासनाकडे दिले नाही.मात्र उपचार घेणाऱ्या प्राण्यांची सविस्तर माहिती आमच्याकडे आहे. याशिवाय काही गैरसमज देखील उभे राहिले आहेत. लवकरच ते दूर करून पुन्हा आपले सेवेचे काम निरंतर सुरु ठेवणार असल्याचा दावा संस्थाचालक कुशल शाह यांनी केला आहे.