भाईंदर:- झाडांच्या पालापाचोळ्यापासून जळाऊ ठोकळे व खत निर्मिती करण्याचा महापालिकेचा प्रकल्प मागील काही दिवसांपासून बंद असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, प्रकल्पस्थळी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिगारे उभे राहू लागले आहेत.मिरा रोड व भाईंदर शहरात रस्त्याच्या कडेला, उद्यानांमध्ये तसेच मोकळ्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्यात आली आहेत. शहरातील हरित पट्टा टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी अशा सर्व झाडांची निगा महापालिकेमार्फत घेतली जाते. त्यानुसार झाडांना नियमित पाणी देणे, झाडांची छाटणी करणे आणि गळून पडलेली पाने गोळा करण्याचे काम उद्यान विभागामार्फत केले जाते.
या प्रक्रियेत गोळा होणाऱ्या फांद्या व पानांचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे जमा झालेल्या पालापाचोळ्यापासून खत निर्मिती व फांद्यांवर प्रक्रिया करून जळाऊ ठोकळे बनवण्याचा प्रकल्प महापालिकेने घोडबंदर येथील मोकळ्या जागेत सुरू केला आहे. यामधून तयार होणारे खत विक्रीसाठी उपलब्ध केले जाते, तर जळाऊ ठोकळे स्मशानभूमीमध्ये वापरण्यात येतात.
सुरुवातीला हा प्रकल्प महापालिका स्वतः चालवत होती. मात्र, प्रशासनातील मनुष्यबळाची कमतरता व कामाचा व्याप लक्षात घेता, हे काम कंत्राटदारामार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, कंत्राटदाराशी करार केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच हे काम बंद झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रकल्पस्थळी कचऱ्याचे ढिगारे :
मिरा भाईंदर शहरात पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी करून घेण्याचे सक्त आदेश आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी वृक्ष प्राधिकरण विभागाला दिले आहेत. या आदेशानुसार छाटणी केलेला पालापाचोळा प्रकल्पस्थळी आणून टाकला जात आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया केली जात नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिगारे उभे राहत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
कंत्राटदाराचा काम करण्यास नकार :
सदर प्रकल्प चालवण्याबाबत २०२४ साली महापालिकेने मे सिरो एनर्जी या संस्थेसोबत पाच वर्षांचा करार केला होता. ही संस्था प्रकल्प चालवून महापालिकेला एक निश्चित रक्कम अदा करणार होती. याशिवाय, प्रकल्पात तयार होणारे खत व जळाऊ ठोकळे आवश्यकतेनुसार महापालिका घेणार असल्याचे ठरले होते. मात्र, प्रशासनाच्या काही अटी व शर्ती कंत्राटदाराला मान्य नसल्यामुळे त्याने काम बंद केल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.