पालिकेचा कोटय़वधींचा औषधसाठा धूळखात

कोविड लसीकरणाच्या लशी असलेल्या पुठ्टय़ाच्या पेटय़ांना बुरशी लागली तरी त्यातील लशी या लसीकरणासाठी वापरल्या जात आहेत, असे आढळून आले आहे.

वैधता असलेला औषधसाठा कचऱ्यात तर लशींच्या पेटय़ांना बुरशी

प्रसेनजीत इंगळे

विरार : एकीकडे पालिका नागरिकांच्या आरोग्यासाठी कोटय़वधीची औषधे खरेदी करते आणि नंतर हीच औषधे धूळखात ठेवून नंतर वैधता असतानाही ती कचऱ्यात टाकण्याचा प्रकार समोर आला आहे.  कोविड लसीकरणाच्या लशी असलेल्या पुठ्टय़ाच्या पेटय़ांना बुरशी लागली तरी त्यातील लशी या लसीकरणासाठी वापरल्या जात आहेत, असे आढळून आले आहे. या अशा प्रकाराने वसई-विरार पालिका प्रशासनाचा नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे म्हटले जात असून प्रशासनाचा कोटय़वधींचा खर्च वाया जात आहे.

वसई-विरार महानगरपालिकेचे वसई, दिवाणमान या परिसरात औषधाचे गोदाम आहे.  महापालिकेच्या रुग्णालयांत वापरली जाणाऱ्या औषधांचा साठा या गोदामात असतो. येथूनच सर्व ठिकाणी औषधांचे वितरण केले जाते. मात्र या औषधांची साठवणूक शास्त्रोक्त पद्धतीने केली जात नाहीत.  ही औषधे  धूळखात पडलेली असतात.  पालिकेने करोना लसीकरणासाठी पाच लाखांहून अधिक मात्रा मागवल्या आहेत. याची मुदत जानेवारी २०२५ मध्ये संपणार आहे. पण   सर्व  लशींचा ठेवलेला साठा पावसात भिजून त्याच्या पुठ्ठय़ावर बुरशी चढली आहे. पेटय़ांमध्ये धूळ साचली आहे. हाच  साठा सध्या शहरात लसीकरणासाठी वितरित केला जात आहे. 

करोनाकाळात शासनाकडून पालिकेला मोठय़ा प्रमाणात औषधांचा साठा पुरविण्यात आला आहे. हा संपूर्ण साठा पालिकेने कचऱ्यात टाकला आहे. यात करोनाकाळात शासनाकडून आलेला कापूस (कॉटन) वैधता असतानाही या इमारतीच्या गच्चीवर कचऱ्यात टाकले आहेत.   इतरही औषधांचे साठे  अस्ताव्यस्त पडल्याचे येथे दिसून येतात.  इमारतीच्या गच्चीत असलेल्या सभागृहात इतरही महत्त्वाची औषधे याची वैध्यता २०२३ पर्यंत आहे. तीसुद्धा तापमानाची मर्यादा न जोपासता खुल्या जागेत

ठेवली आहेत. त्यावर सरळ सूर्यप्रकाश येत असल्याने या औषधाच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून लहान मुलांसाठी आलेल्या विटामिन ‘ए’ चा भलामोठा साठा वाया घालवला आहे. त्याचा वापरच केला नसल्याची माहिती हाती आली आहे.  शहरात कुपोषणाचा स्थर वाढत असताना पालिकेने लाखो रुपयांची औषधे वाया घालवली आहेत. तसेच अनेक महागडी औषधे वातानुकूलित साखळी जोपासली नसल्याने खराब झाली आहेत.

अद्ययावत गोदामाचा अभाव

वसई-विरार महानगरपालिकेकडे औषधे साठविण्यासाठी अद्ययावत गोदाम नाही.  असलेल्या गोदामात आवश्यक असलेली वातानुकुलीत साखळी, तापमान योग्य प्रमाणात नसल्यामुळे त्याचा औषधांवर परिमाण होतो. पालिका नव नवीन रुग्णालयाचे घाट घालत आहे. पण या रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी औषधे मात्र वाऱ्यावर आहेत. यामुळे पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणे कितपत सुरुक्षित आहे? असा सवाल नागरिक विचारात आहेत.  

भ्रष्टाचाराचा संशय

वसई-विरार महानगर पालिका दरवर्षी औषधे खरेदी करण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करते. पण ही औषधे वैधता संपेपर्यंत गोदामातमध्ये धूळ खात ठेवली जातात आणि पुन्हा मागणी निर्माण करून ती मागवली जातात. यामध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप रुग्नमित्र राजेंद्र ढगे यांनी केला आहे. ढगे यांनी माहिती दिली की, करोना काळात अनेक वेळा औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता. अनेक रुग्णालयात औषधांचा साठाच उपलब्ध नसल्याचे सांगितले जात होते. पण मुळात पालिकेच्या गोदामात औषधे दुरवस्थेत साठवली जात आहे. औषध साठय़ाचे लेखापरीक्षण केले तर मोठा भ्रष्टाचार समोर येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. 

पालिकेच्या गोदामातील औषध साठय़ांची  पाहणी केली जाईल आणि अशा पद्धतीने जर साठा ठेवला असेल तर तातडीने त्यावर कारवाई केली जाईल.

-संतोष देहेरकर,

अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महानगर पालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Municipal corporation stockpile crores medicine dust ysh

ताज्या बातम्या