scorecardresearch

पालिकेची पुन्हा वनीकरण मोहीम ;पावसात एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

करोनाकाळात पालिकेची थंडावलेली वनीकरम्ण मोहीम येत्या पावसात पुन्हा सुरू होणार आहे.

वसई: करोनाकाळात पालिकेची थंडावलेली वनीकरम्ण मोहीम येत्या पावसात पुन्हा सुरू होणार आहे. शहरात कृत्रिम जंगल उभारण्याचा एक भाग म्हणून ५ वर्षांचा वृक्ष लागवडीचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात पालिका १ लाख झाडे लावणार आहेत. कृत्रिम जंगल योजनेअंतर्गत एकूण ५ टप्पे असून केवळ ३ टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले आहे.
वसई-विरार महापालिकेने २०१७ पासून शहरात कृत्रिम जंगल विकसित करम्ण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली होती. महाराष्ट्र वन विकास महामंडळ आणि वन विभागाच्या सहकार्याने पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने शहर परिसरात वनीकरण करणे सुरू केले होते. विरारमधील शिरगाव, गास, कोपरी नािरगी, चंदनसार, कण्हेर, विरार, नालासोपारा येथील बिलालपाडा, धानीव, पेल्हार या ठिकाणी कृत्रिम जंगल तयार करून त्या ठिकाणी पर्यटनस्थळ, जंगल पर्यटन, पक्षीअधिवास, हरीण अभयारण्य, औषधी वनस्पती उद्याने विकसित करण्यात येणार आहे. आता पर्यंत मागील तीन वर्षांत वनीकरणाचे ३ टप्पे पालिकेने पुर्ण केले होते. २०२० मध्ये करोनाची साथ पसरली. पालिकेची संपूर्ण यंत्रणा करोना निवारणासाठी व्यस्त झाली होती. यामुळे वनीकरणाची मोहीम थांबविण्यात आली होती. आता करोनाचे संकट कमी झाले असल्याने यंदाच्या वर्षी एक लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
यामध्ये बांबू, आंबा, वड, पिंपळ, काजू, खैर, गुलमोहर, कडुलिंब, जांभूळ, बकुल , चिंच, आपटा, एन अशा विविध प्रकारच्या वृक्षाच्या प्रजातीचा समावेश असणार आहे. याआधी महापालिकेने २०१७ ते २०२० या तीन वर्षांत शिरगाव, नारंगी, खार्डी कोशिंबे, धानिव अशा विविध ठिकाणच्या भागांतील २७९ हेक्टर क्षेत्रात ३ लाख ९ हजार ३७५ इतक्या वृक्षांची लागवड केली होती. त्यातील २ लाख ६८ हजार ४२४ इतके वृक्ष सुस्थितीत आहेत. मागील वर्षी करोनासंकट व जागेअभावी वृक्ष लागवड करता आली नव्हती मात्र या वर्षी वृक्ष लागवड करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला असून १ लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मागील दोन वर्षे करोनामुळे वृक्ष लागवड करता आली नव्हती. या वर्षी पावसाळय़ात एक लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यासाठी वन विभागाच्या सहकार्याने जागाही उपलब्ध केली जाणार असून टप्प्या टप्प्याने वृक्षांची लागवड होणार आहे. – नयना ससाणे, उपायुक्त महापालिका वृक्ष प्राधिकरण विभाग
तीन हजार वृक्ष लागवडीसाठी निविदा
वसई- विरारमधील जंगलपट्टय़ात ज्याप्रमाणे वृक्ष लागवड केली जाणार आहे त्याचप्रमाणे शहरात विविध ठिकाणी असलेल्या मोकळय़ा जागेत ही तीन हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी निविदा काढण्यात आली आहे. लवकरच वृक्षारोपण करून योग्य त्या प्रकारे त्या वृक्षांचे संवर्धन केले जाणार आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Municipal reforestation campaign aims plant one lakh trees rainy season amy

ताज्या बातम्या