कोटय़वधी रुपये वाया

विरार : वसई-विरार महानगरपालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून स्मार्ट ई शौचालय खरेदी केले होते. पण या शौचालयाची ठेकेदाराने कोणतीही देखभाल केली नसल्याने ही  स्मार्ट ई शौचालय भंगारात सडली आहेत. मागील तीन वर्षांपासून ठेकेदाराने याकडे ढुंकूनही पहिले नाही. यामुळे नागरिकांचा कोटय़वधीचा पैसा वाया गेला आहे.

वसई-विरार महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वसई-विरार महानगरपालिकेने सन २०१९ मध्ये प्रॅनिक एन्टरप्राईजेस या ठेकेदाराला महानगर पालिकेच्या विविध कार्यक्षेत्रात स्मार्ट शौचालय बसविणे आणि १० वर्षांच्या कालावधीसाठी  देखभाल दुरुस्ती करणे यासाठी ठेका दिला आहे. यात पालिकेन एका स्मार्ट शौचालयासाठी ९ लाख रुपये मोजले आहेत. त्यानुसार ९ प्रभागात ९० लाख रुपये खर्च करून पालिकने सर्व प्रभागात ही स्मार्ट शौचालय बसविली असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. परंतु यातील बहुतांश ठिकाणी हे स्मार्ट शौचालय आढळून आले नाहीत. तर ज्या ठिकाणी आहेत त्या शौचालयाची मोठी दुरवस्था झाली आहे. काही शौचालयाचे भाग चोरीला सुद्धा गेले आहेत. त्यांची पुन्हा दुरुस्ती होऊ शकत नाही. 

या संदर्भात माहिती देताना पालिकेने सांगितले की या संदर्भात ठेकेदाराला नोटीस पाठविली आहे. यावर कारवाई केली जाईल असे सांगत पालिका पळवाटा शोधात आहे. पण ठेकेदारावर अजूनही कोणतीही कारवाई पालिकेने केली नाही. यामुळे नागरिकांचा कोटय़ावधीचा पैसा पालिका ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी वापरात आहे अशी टीका केली जात आहे.

या अगोदर ही पालिकेने स्वच्छ अभियान भारत अंतर्गत शहरात शौचालयाचे जाळे उभे केले होते. पण त्यातही मोठा भ्रष्ट्राचार झाल्याच्या प्रकार माहिती अधिकारात उघड झाला होता. यावरही पालिकेने चौकशी समिती नेमून कारवाई करण्याचे सांगितले होते पण चार वर्षे उलटले तरी पालिकेने या संदर्भात समिती नेमली नाही.

स्मार्ट शौचालयांची ठिकाणे

प्रभाग समिती अ मध्ये विरार पष्टिद्धr(१५५)मेला रेल्वे स्थानक परिसरात, प्रभाग समिती ब मध्ये ओस्वाल नगरी चौक, प्रभाग समिती सी मध्ये नारंगी चौक विरार पूर्व, प्रभाग समिती डी मध्ये चंदननाका नालासोपारा पूर्व, प्रभाग समिती इ मध्ये पाटणकर सिग्नल, प्रभाग समिती एफ मध्ये संतोष भुवन, प्रभाग समिती एच मध्ये अंबाडी रोड, प्रभाग समिती आय पार नाका याठिकाणी हे ई शौचालये बसविण्यात आले आहेत.

दुप्पट किंमतीत खरेदी

 मिळालेल्या माहिती नुसार वसई-विरार महानगर पालिकेने ठेकेदाराकडून खरेदी केलेले स्मार्ट शौचालयांची किंमत बाजारात ३ ते ५ लाख आहे. असे असतानाही पालिकेने ही शौचालये दुप्पट किमतीत खरेदी केल्याचा आरोप भाजप उपाध्यक्ष मनोज पाटील  यांनी केला आहे. यामुळे या खरेदीत पालिकेतील कुणाचे भले झाले असा सवाल त्यांनी विचारला आहे.  शहरात शौचालयाची आवश्यकता असताना पालिका अशा पद्धतीने काम करते ही लाजिरवाणी बाब आहे.