scorecardresearch

पालिकेचे ‘स्मार्ट टॉयलेट’ भंगारात; १० वर्षांचा ठेका देऊनही ठेकेदाराकडून देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष

वसई विरार महानगरपालिका नागरिकांच्या सोयीसाठी लावलेले स्मार्ट शौचालय ठेकेदाराचे १० वर्षांचे दायित्व असूनही भंगारात पडले आहेत. यामुळे ८० लाख रुपये मोजूनही या शौचालयाकडे ठेकेदाराने लक्ष दिले नसल्याने हा पैसा पाण्यात गेला आहे.

विरार : वसई विरार महानगरपालिका नागरिकांच्या सोयीसाठी लावलेले स्मार्ट शौचालय ठेकेदाराचे १० वर्षांचे दायित्व असूनही भंगारात पडले आहेत. यामुळे ८० लाख रुपये मोजूनही या शौचालयाकडे ठेकेदाराने लक्ष दिले नसल्याने हा पैसा पाण्यात गेला आहे. सन २०२८ पर्यंत या शौचालयाची देखभाल दुरुस्ती करण्याचे काम ठेकेदाराचे असतानाही पालिकेने कोणतेही लक्ष पुरवले नाही. परिमाणी ही शौचालये भंगारात गेली असून त्याचे अनेक भाग चोरटय़ांनी पळविले आहेत. यामुळे या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
वसई विरार महानगरपालिकेने सन २०१९ मध्ये आठ प्रभागात नागरिकांच्या सुविधेसाठी स्मार्ट शौचालये उभारण्याचे काम एका ठेकेदाराला दिले होते. त्याच्याशी केलेल्या करारनाम्यात ठेकेदाराने शौचालये पुरविण्याबरोबर १० वर्षांचे देखभाल दुरुस्तीचे दायित्व देण्यात आले आहे. पण ठेकेदाराने कोणतीही देखभाल, दुरुस्ती केलीच नसल्याने ही स्मार्ट टॉयलेट भंगारात सडली आहेत. मागील चार वर्षांपासून ठेकेदाराने याकडे ढुंकूनही पहिले नाही. यामुळे नागरिकांचा कोटय़वधीचा पैसा भंगारात गेला आहे.
वसई विरार महानगरपालिकेने प्रॅनिक एन्टरप्राईजेस या ठेकेदाराला महानगरपालिकेच्या विविध कार्यक्षेत्रात स्मार्ट टॉयलेट बसविणे आणि १० वर्षांच्या कालावधीसाठी देखभाल दुरुस्ती करणे यासाठी ठेका दिला आहे. यासाठी पालिकेने एका स्मार्ट टॉयलेटसाठी ९ लाख रुपये मोजले आहेत.
पालिकेने प्रभाग समिती अ मध्ये – विरार पश्चिमेला रेल्वे स्थानक परिसरात, प्रभाग समिती ब मध्ये ओस्वाल नगरी चौक, प्रभाग समिती सी मध्ये नारंगी चौक विरार पूर्व, प्रभाग समिती डी मध्ये चंदननाका नालासोपारा पूर्व, प्रभाग समिती इ मध्ये पाटणकर सिग्नल, प्रभाग समिती एफ मध्ये संतोष भुवन, प्रभाग समिती एच मध्ये अंबाडी रोड, प्रभाग समिती आय पार नाका
पालिकेच्या दप्तरी जरी आठ प्रभागात ही शौचालये बसवली असली तरी प्रत्यक्षात काही प्रभागात ही शौचालये आजतागायत लागलीच नाहीत असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. तर ज्या ठिकाणी ही शौचालये आहेत ती पूर्णत: सडून भंगारात गेली आहेत. ठेकेदाराने त्याची कोणतीही देखभाल न केल्याचे एकही प्रभागातील शौचालय कार्यरत नाही.
उपलब्ध शौचालयाचे साहित्य सडले अथवा चोरीला गेले आहे. त्यांची पुन्हा दुरुस्ती होऊ शकत नाही. पालिकेने या शौचालयाकडे कधीच लक्ष पुरविले नाही. पालिकेची नैतिक जबाबदारी असतानाही पालिकेने चार वर्षांत या शौचालयाची कोणतीही तपसणी केली नाही. अथवा ठेकेदाराला समज दिली नाही. पालिकेने ठेकेदाराला पाच महिन्यापूर्वी नोटीस बजावली होती. पण ठेकेदारावर अजूनही कोणतीही कारवाई पालिकेने केली नाही.
स्मार्ट शौचालय खरेदीत घोटाळा
मिळालेल्या माहितीनुसार वसई विरार महानगरपालिकेने ठेकेदाराकडून खरेदी केलेले स्मार्ट टॉयलेटची सध्या बाजारात ३ ते ४ लाख किंमत आहे. असे असतानाही पालिकेने ही शौचालये दुप्पट किमतीत खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे ही स्मार्ट शौचालये खरेदीप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी करून ठेकेदाराला काळय़ा यादीत टाकावे अशी मागणी केली जात आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Municipal smart toilet ruins contractor neglects maintenance repairs awarding 10 year contract amy