भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील खासगी शाळेत आरटीई कायद्यांतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थाना नियमानुसार मोफत पाठपुस्तकं, लेखन साहित्य आणि गणवेश पुरवण्याचे सक्त आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. तसेच या नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बालकाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. मीरा-भाईंदर शहरातील ९० अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २०१८-१९ पासून ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु यंदा २४३ विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळाला आहे.
मात्र या विद्यार्थाना खासगी शाळांकडून नियमानुसार योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नव्हत्या. या विद्यार्थाना पुस्तके, गणवेश तसेच लेखन साहित्य मोफत उपलब्ध करणे अनिवार्य असताना खासगी शाळांनी या नियमाला सपशेल हरताळ फासला होता. या संदर्भात प्रशासनाला सातत्याने तक्रार मिळत असल्यामुळे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यात खासगी शाळांनी आरटीईअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यात सवलत देण्यास नकार दिल्यास त्याची माहिती पालिकेला देण्याचे आवाहन केले आहे. तसेच यात दोषी आढळून येणाऱ्या शाळेवर शिक्षण अधिनियममधील २००९च्या तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील गरजू मुलांना शिक्षण मिळावे आणि आरटीई कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र त्यात एखादी खासगी शाळा सहकार्य करत नसेल तर त्यावर कठोर कारवाई निश्चितच करण्यात येईल. – दिलीप ढोले, आयुक्त, मीरा-भाईंदर महानगरपालिका