केंद्राकडून अहवाल न मिळाल्याने मीरा-भाईंदर पालिकेसमोर पेच
भाईंदर : महिन्यापूर्वी केंद्र शासनाकडून करण्यात आलेल्या डिजिटल पशुगणनेचा अहवाल मीरा भाईंदर महानगरपालिकेला अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे शहरात किती भटके श्वान आहेत याची आकडेवारी पालिकेकडे नाही. त्यामुळे शहरातील श्वानांचे निर्बीजीकरण रखडले असून याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मीरा भाईंदर शहरात भटक्या श्वानाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ही श्वााने ये-जा करणाऱ्या नागरिकांवर विनाकारण भुंकत असून चावा घेण्याकरिता पाठलाग करत असल्याच्या घटनादेखील घडून आल्या आहेत. शहरातील या भटक्या श्वानांचा त्रास सामान्य नागरिकांना होऊ नये म्हणून पालिकेकडून खबरदारीची पावले उचलण्यात येतात. यात या श्वानांवर उत्तन येथे असलेल्या पालिकेच्या पशू रुग्णालयात निर्बीजीकरण प्रक्रिया करण्यात येते. सन २०१९-२० मध्ये २ हजार ६८२ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते. यामुळे श्वानाच्या वाढत्या संख्येवर आळा घालण्यास मदत होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून करोनाचे संकट डोक्यावर असल्याने ही सर्व कामे रखडली आहेत.
देशात वाढत असलेल्या पशूंची संख्या मोजण्याकरिता केंद्र शासनाकडून ‘पशु जनगणना’ मोहीम राबवण्यात येते. यात मोकाट फिरत असलेल्या श्वान, म्हशी, गायी आणि डुकरांची यादी तयार करून त्याची आकडेवारी जाहीर केली जाते. मात्र २०२१ साली ही जनगणना डिजिटल पद्धतीने करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार मार्च महिन्यात मोकाट फिरत असलेल्या श्वानाचा ‘मोबाइल टॅब’द्वारे फोटो काढून तो शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येत होता. यामुळे यंदा पालिकेला मोकाट जनावरांची प्रत्यक्ष माहिती मिळण्याऐवजी शासनाच्या वेब पोर्टलवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र या पशुगणनेला दहा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरदेखील पालिकेला शहरातील मोकाट श्वानांची माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे नेमक्या किती श्वाानांचे निर्बीजीकरण करण्याचे असून वाढती श्वान संख्या कशा प्रकारे आटोक्यात आणावी असा प्रश्न पालिकेला पडला आहे.
शासनाकडून अद्याप शहरातील मोकाट श्वानांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमके किती श्वान आहेत हे सांगू शकत नाही. मात्र मोकाट जनावरांची यादी पुढील महिन्यात मिळणार असून तेव्हा हा आकडा जाहीर करण्यात येईल.
– डॉ. विक्रम निराटले, पशु वैद्यकीय अधिकारी