मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांपुढे ओळख पटविण्याचे आव्हान

सुहास बिऱ्हाडे

वसई : मीरा-भाईंदर आणि वसई विरार शहरातील मागील वर्षभरात झालेल्या ७ मृत्यूंचे गूढ अद्याप उलगडलेले नाही. यापैकी ६ मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नसून त्यात ४ महिलांचा समावेश आहे. केवळ या हत्यांचा तपासच नाही तर त्यांची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

वसईत एकाच आठवडय़ात सापडेल्या दोन मृतदेहांनी खळबळ उडाली आहे. विरार पूर्वेच्या वज्रेश्वरी रोड येथे पिंपात एका पुरुषाचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर शुक्रवारी विरारच्याच मारंबळ पाडा येथील जेटीवर एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

या दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. स्थानिक पोलिसांबरोबर गुन्हे शाखा या दोन्ही हत्यांचा समांतर तपास करत आहेत. मीरा भाईंदर आणि वसई विरार शहरांचे मिळून नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन झाले.

या शहरात एकूण ३ परिमंडळे असून आता १५ पोलीस ठाणे आहेत. आयुक्तालयाच्या स्थापनेपासून शहरात एकूण ५५ जणांच्या हत्या झाल्या होत्या. त्यापैकी ७ हत्यांचे गूढ अद्याप उलगडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. यापैकी ६ जणांची ओळख पटलेली नाही. ज्या मृतदेहांची ओळख पटलेली नाही त्यामध्ये ४ महिलांचा समावेश आहे. या ७ हत्यांपैकी केवळ एका मयताची ओळख पटलेली आहे, मात्र ६ मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

आमच्या आयुक्तालयाच्या हद्दीत मागील वर्षभरात ७ गुन्ह्यांची उकल झालेली नाही. त्यापैकी ६ मृतदेहांची ओळख पटविण्याचे काय युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलीस उपायु्क्त डॉ. महेश पाटील (गुन्हे) यांनी दिली. शहरातील तसेच राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तीन वेळा तपासून झालेल्या आहेत. याशिवाय मृतदेहांची हजारो छायाचित्रे काढून विविध ठिकाणी वितरित करून शोध सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

समाजमाध्यमांवरून ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नोकरी- व्यवसायानिमित्त अनेक जण शहरात येत असतात. त्यामुळे ते बेपत्ता झाले तरी लवकर त्याची माहिती मिळणे कठीण जाते, असे पोलिसांनी सांगितले.

महामार्गालगत मृतदेह टाकण्याच्या घटना

पोलीस आयुक्तालयात झालेल्या ५५ हत्यांपैकी ४८ हत्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील अनेक मृतदेह हे मुंबई -अहमदाबाद महामार्गावर टाकण्यात आले होते. मुंबई परिसरात हत्या करुन मृतदेह महामार्गालगत टाकून दिले जाण्याचे प्रकार वाढले आहेत. हा परिसर निर्जन असतो. त्यामुळे सहज गाडीतून मृतदेह आणून टाकणे सोपे जाते असे पोलिसांनी सांगितले. दोन वर्षांंपूर्वी असे प्रकार रोखण्यासाठी महामार्गावर मोटारसायकीलने गस्ती घालण्याचा प्रस्ताव होता. मात्र त्याची अमंलबजावणी झाली नाही. महामार्गावरील मृतदेह टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी महामार्गावर अधिक प्रमाणात सीसीटीव्ही लावले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.