वसई : नायगाव पूर्वेच्या टीवरी परिसर तब्बल १ हजार कोटी रुपयांचा जमीन घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्रे आणि अधिकारांचा गैरवापर करून हा जमीन घोटाळा करण्यात आला आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक हेमंत पाटील, धर्मेश शहा व अन्य दोन मुख्य आरोपींसह महसूल विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील धनश्री डेव्हलपर्स प्रा. लि कंपनीचे संचालक आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शंकरराव बोरकर (६६) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २००८ पासून हेमंत पाटील आणि धर्मेश शहा शंकरराव बोरकर यांच्यासह काम करत होते. यादरम्यान त्यांनी बोरकर आणि त्यांच्या मुलाचा विश्वास संपादन केला. मात्र, त्यानंतरही नायगाव येथील मौजे टिवरी येथील ६५.३३ एकर जमिनीबाबत बनावट कागदपत्रे तयार करून ती बेकायदेशीररीत्या विकल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
जमिनीचे रितसर ७/१२ उतारे, नोंदणीकृत खरेदीखत आणि साठेकरार अस्तित्वात होते. मात्र, तरीही कालबाह्य आणि रद्द झालेले मुखत्यारपत्र वापर वापरून तसेच बिगर-नोंदणीकृत कागदपत्रांच्या आधारे अनेक सर्व्हे नंबरच्या जमिनी परस्पर विकल्या गेल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. तसेच बोरकर यांच्या संमतीशिवाय डीडीपीएल ग्लोबल प्रा. लि आणि युनिकॉर्न इंका अँड इस्टेट प्रा. लि. या कंपन्यांच्या नावावर जमिनीची खोटी नोंदणी करण्यात आली. या मोठ्या घोटाळ्यात केवळ खाजगी व्यक्तीच नव्हे, तर सरकारी यंत्रणेवरही ठपका ठेवण्यात आला आहे. वसई-२ निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी, तहसीलदार आणि तलाठ्यांनी महसुली नियमांचे उल्लंघन करून आरोपींना मदत केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी बुधवारी नायगाव पोलीस ठाण्यात हेमंत पाटील, धर्मेश शहा, दिपक खोचरे, मच्छिंद्र भोईर आणि इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३१८ (४), ३१६ (५),३१६ (२), ३३६(३) ३३८, ३४०(१), ३३९(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार, या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे. बनावट कागदपत्राच्या आधारे हा गैरप्रकार करण्यात आला आहे. याप्रकरणी विकासक हेमंत पाटील आणि धर्मेश शहा या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याचे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी सांगितले आहे.

