वसई: नायगाव पूर्व ते बापाणे रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली दुरवस्था आणि पालिकेच्या दुर्लक्षामुळे वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले आहे. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व काँग्रेस पक्षा तर्फे रश्मी स्टार सिटी परीसरात रास्ता रोको आंदोलन केले. दीड ते दोन तास आंदोलन कर्त्यांनी मुख्य रस्त्याच्या मध्येच ठिय्या मांडला होता. नायगाव पूर्वेच्या भागातून नायगाव बापाणे असा महामार्गाला जोडणारा ५.२ किलोमीटर लांबीचा मुख्य रस्ता गेला आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते.
परंतु या रस्त्याची देखभाल दुरुस्ती योग्य रित्या केली जात नसल्याने रस्त्यावर मोठं मोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्डयातून प्रवास करताना रिक्षाचालक यांच्यासह वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून दुचाकीस्वारांच्या अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. महापालिका प्रशासनाने तात्काळ खड्डे बुजवावेत, यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने २७ ऑगस्टपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले.
महापालिका जनतेकडून कर वसूल करते मात्र पायाभूत सोयीसुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला. तसेच सद्यस्थितीत जी रस्त्याची डागडुजी केली जाते ती सुद्धा अतीशय निकृष्ट दर्जाची होत असल्याचे आंदोलन कर्ते नितीन म्हात्रे यांनी सांगितले. या आंदोलनात दोन्ही पक्षांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलन कर्त्यांनी रस्त्याच्या मधोमध ठिय्या आंदोलन मांडल्याने काही काळ दोन्ही बाजूने वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दुरुस्तीचे आश्वासन दिल्यानंतर दीड ते दोन तासांनी हे आंदोलन मागे घेतले.
गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीची मागणी
आगामी गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावरून चाकरमानी व भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही कारणे न सांगता गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी आणि नागरिकांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. पालिकेने आता तरी जागं होऊन या रस्त्याचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी आशा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
