वसई: नायगाव पूर्व ते बापाणे रस्त्याच्या दयनीय अवस्थेवरून नागरिक व रिक्षाचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, आठवड्याभरात रस्ता दुरुस्त न झाल्यास ‘रिक्षा बंद’ आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

​सुमारे पाच किलोमीटरच्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नावर यापूर्वी अनेकदा आंदोलने झाली आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र कामाचा वेग मंदावल्याने रस्त्याची परिस्थिती सुधारण्याऐवजी पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गणेशोत्सवापूर्वी शहर खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते, मात्र गणेशोत्सवानंतरही या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही.

त्यामुळे वाहनचालकांना दररोज खड्ड्यांमधून मार्ग काढावा लागत असल्याने वाहनांच्या देखभालीचा खर्च वाढला आहे. अनेक रिक्षांचे स्पेअर पार्ट खराब होत असून वारंवार दुरुस्ती करावी लागत असल्याने रिक्षाचालकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. तसेच अपघाताचा धोकाही वाढल्याने महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

​तीन दिवसांपूर्वी शिवसेना ( ठाकरे गटाचे) नायगाव शहरप्रमुख मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रिलायबल परिसरात ‘रास्ता रोको’चा इशारा पालिकेला देण्यात आला होता, परंतु आठवडाभरानंतरही स्थितीत सुधारणा झालेली नाही. आता जूचंद्र रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी पालिका प्रशासनाला आठवड्याभराची मुदत देत, रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र ‘रिक्षा बंद’ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नायगाव-बापाणे रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.