वसई: नायगाव पूर्वेकडील अत्यंत महत्त्वाच्या नायगाव–बापाणे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ११ कोटी रुपये खर्च करूनही अल्पावधीतच रस्त्याची चाळण झाली होती. या कामाच्या निकृष्ट गुणवत्तेबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. अखेर या वाढत्या तक्रारींची दखल घेत वसई-विरार महापालिका आयुक्तांनी गुरुवारी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली. तसेच, नागरिकांचा त्रास लक्षात घेता या रस्त्याचे काम डिसेंबरपूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित ठेकेदाराला दिले आहेत.
नायगाव पूर्वेकडून मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणारा हा ५.२ किलोमीटर लांबीचा मुख्य रस्ता आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची मोठी वर्दळ असते. महापालिकेने ११ कोटी रुपये खर्चून या रस्त्याचे मजबुतीकरण केले होते, परंतु वर्षभरातच डांबर उखडून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले.
या धोकादायक आणि खड्डेमय रस्त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, सध्या रस्त्यावरील धुळीमुळे स्थानिक नागरिक व वाहनचालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एवढा मोठा निधी खर्च करूनही रस्ता खराब झाल्याने कामाच्या दर्जावर आणि ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात होते.
आंदोलने आणि तक्रारींनंतर आयुक्तांची प्रत्यक्ष पाहणी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात स्थानिक रिक्षाचालक, नागरिक आणि विविध राजकीय पक्षांनी आक्रमक होत आंदोलने केली होती. नागरिकांच्या सततच्या तक्रारींनंतर गुरुवारी महापालिका आयुक्तांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह रस्त्याचा पाहणी दौरा केला.
या पाहणीदरम्यान आयुक्तांनी कामाचा सविस्तर आढावा घेतला. काम तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देतानाच, कामाचा दर्जा आणि योग्य ती गुणवत्ता राखण्याबाबत ठेकेदाराला कडक सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या वाढत्या आक्रोशानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. काँक्रिटीकरण: स्टार सिटी परिसरातील ८०० मीटर अंतराच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जात आहे. यातील एका लेनचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या लेनचे काम प्रगतीपथावर आहे. ज्या ठिकाणी रस्ता उखडला आहे आणि खड्डे पडले आहेत, तेथे नवीन डांबरीकरण केले जाईल, अशी माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिली आहे.
