वसई: नायगाव येथील भोयदापाडा रस्त्याचे मजबुतीकरण आणि आर.सी.सी. गटार बांधणीच्या कामावरून बहुजन विकास आघाडी ( बविआ) आणि भाजप यांच्यात जोरदार श्रेयवाद पहायला मिळाला. विशेष म्हणजे एकाच दिवशी, आणि एकाच ठिकाणी दोन्ही पक्षांनी भूमीपूजनाचा घाट घातल्याने परीसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
नायगाव पूर्वेच्या भागातून गेलेल्या टीवरी फाटा ते भोयदापाडा रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली आहे. तर दुसरीकडे सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटार व्यवस्था नसल्याने येथील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात सर्वाधिक अडचणी निर्माण होऊन प्रवाशांचे हाल होतात. यासाठी या रस्त्यांची दुरुस्ती व गटार व्यवस्था तयार करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिक सातत्याने करीत आहे.
अखेर या रस्त्यांचे मजबुतीकरण व आरसीसी गटार व्यवस्था अशी दोन्ही कामे महापालिकेकडून मार्गी लावली जाणार आहेत. यासाठी २६ कोटी ७ लाख रुपये निधीचे ही नियोजन केले आहे. रविवारी भाजपा आणि बविआ या दोन्ही पक्षांनी या कामांच्या भूमीपूजनाचे स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केले होते.
सकाळी आमदार स्नेहा दुबे-पंडित, आमदार विलास तरे व भाजपचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शहरातील रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा केला होता. त्यावेळी तत्कालीन आयुक्तांना पावसाळ्या आधी रस्त्याची कामे पूर्ण करण्याच्या संदर्भात आदेश दिले असल्याचे आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी यावेळी नमूद केले. विकासकामांच्या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला आहे त्यामुळे त्याला आज यश आले आहे. त्यामुळे हे श्रेय आमचेच आहे, असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला.
तर दुपारी बहुजन विकास आघाडीने ही महापौर अजीव पाटील व नगरसेवक व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. स्थानिक विकास हा बविआच्या माध्यमातूनच होतो आणि वर्षानुवर्षे या भागातील कामांचा पाठपुरावा आम्हीच करत आहोत, असे मत बविआ कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
एकाच कामाचे दोन्ही पक्षाकडून भूमिपूजन पार पडल्याने राजकीय श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे चित्र दिसून आले. राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असली, तरी सामान्य नागरिकांनी मात्र श्रेय कोणाचेही असो, काम निकृष्ट नसावे आणि ते वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
