वसई: ​नायगाव पूर्वेतील चंद्रपाडा-वाकीपाडा परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या २२०/२२ केव्ही ‘जय विजय’ उपकेंद्रात झालेल्या गंभीर तांत्रिक बिघाडामुळे परिसरातील हजारो ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. रविवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास उपकेंद्रातील फिडरमध्ये बिघाड झाल्याने चंद्रपाडा-वाकीपाडा, बापाणे, चिंचोटी आणि मालजीपाडा यांसह लगतच्या भागांतील वीज पुरवठा अचानक खंडित झाला. सलग १२ तासांहून अधिक काळ वीज नसल्याने नागरिकांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले.

​रात्रभर वीज गायब असल्याने लहान मुले, रुग्ण आणि वृद्धांचे हाल झाले. ज्यांच्या घरी इनव्हर्टर होते, त्यांची बॅटरीही काही तासांत डिस्चार्ज झाली. सोमवारी सकाळी शाळकरी मुलांची शाळेची तयारी करताना पालकांची मोठी धांदल उडाली, तर गृहिणी व नोकरदार वर्गाचे दैनंदिन नियोजन पार कोलमडले. सकाळी १० वाजेपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत न झाल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, रविवारी दिवसभरातही काही भागांत दोन ते तीन तास वीज गायब होती, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.

​या भागात सातत्याने वीज जाण्याचे सत्र सुरू असून, अनेक ठिकाणच्या रोहित्रांवर (ट्रान्सफॉर्मर) क्षमतेपेक्षा जास्त अतिरिक्त भार आहे. त्यामुळे वीजवाहिन्या ट्रिप होणे आणि रोहित्रांमध्ये बिघाड होणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे महावितरणने आधी या उपकेंद्राची क्षमता वाढवावी आणि त्यानंतरच नवीन वीज जोडण्या द्याव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्राहकांकडून केली जात आहे. दरम्यान, महावितरणकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा पूर्ववत केला जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.