वसई : नायगाव पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर अपुऱ्या उंचीच्या कठड्यामुळे भरधाव वेगाने जाणारी वाहने थेट खाली कोसळून अपघात घडू लागले आहे. आतापर्यंत तीन दुचाकी खाली कोसळल्या आहेत त्यात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने पुलावरील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नायगाव पुर्व -पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तयार करून वाहतुकीसाठी हा पूल खुला केला आहे. या उड्डाणपूलामुळे वसई-विरार ते मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर या ठिकाणी प्रवास करण्याचे अंतर कमी झाले आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गही जवळ असल्याने या पुलावरून होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १.३ किलोमीटर लांबीच्या नायगाव उड्डाणपूलाला एमएमआरडीएने रेल्वेच्या भागात उंच सुरक्षा कठडे तयार केले आहेत. मात्र, उर्वरित पुलाच्या दोन्ही बाजूने असलेले कठडे हे अपुऱ्या उंचीचे आहेत.

या मार्गावरून अनेक वाहनचालक हे भरधाव वेगाने वाहने चालवितात. तर काही नागरिक कठड्याजवळ थांबतात. याशिवाय उड्डाणपुलावर दोन घातक वळणेही आहेत, ज्यांचा अंदाज वाहनचालकांना लगेच येत नाही. परिणामी अपघात झाल्यास कमी उंचीच्या सुरक्षा कठड्यांमुळे पुलावरून कोसळून गंभीर दुखापत किंवा जीवितहानी होण्याची भीती नागरिकांमधून करण्यात येत आहे.

रविवारी पहाटेच्या सुमारास पुलावर अपघात घडला व दुचाकी कठड्याला धडकून दुचाकीस्वार थेट खाली कोसळून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. उड्डाणपुलावर घडणाऱ्या अपघातादरम्यान दुचाकीस्वार थेट खाली कोसळत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी समोर येत आहे. आतापर्यंत तीन तरुणांना पुलावरून खाली कोसळून आपला जीव गमवावा लागला आहे.

यापूर्वी या पुलाची देखभाल एमएमआरडीएमार्फत केली जात होती. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष झाले होते.आता हा पूल वसई विरार महापालिकेकडे आला आहे. त्यामुळे आता पालिकेने तरी याकडे लक्ष देऊन सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या पुलाची पाहणी करण्याच्या संदर्भात अभियंत्यांना सूचना केली आहे. त्याठिकाणी रेलिंग बसविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालिकेचे प्रभारी शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी सांगितले आहे.

यापूर्वी घडलेल्या घटना

७ डिसेंबर २०२५ – नायगाव उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी थेट खाली कोसळून अपघात घडल्याची घटना रविवारी सकाळी साडेचारच्या सुमारास घडली. यात रोहित रमेश सिंह (२०) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर विघ्नेश कटकिरवा हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

२ मार्च २०२५ – नायगाववरून उमेळाफाटा येथे भरधाव वेगाने जात असताना वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि थेट दुचाकी ही पुलावरून खाली कोसळली यात तुषार जोगळे (३०) याचा जागीच मृत्यू झाला होता.तर सुजल मालपेकर (१९) व सचिन सुतार (३५) हे गंभीर जखमी झाले होते.

८ नोव्हेंबर २०२४ – नायगाव पश्चिमेच्या वडवली परिसरात राहणारा अतुल दुबळा (२०) याचा दुचाकीवरून जात असताना अपघात घडला. व त्याची दुचाकी थेट कठड्याला धडकली यात तो थेट पुलावरून खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला होता.

पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नायगाव पुर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील सुरक्षा कठडे हे कमी उंचीचे आहेत. अपुऱ्या असलेल्या कठड्यामुळे सातत्याने दुचाकीस्वार थेट खाली कोसळून अपघाताच्या घटना समोर येत आहेत. आतापर्यंत तीन तरुणांचा उड्डाणपुलावरून कोसळून मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा कठड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सेफ्टी रेलिंगची आवश्यकता

नायगाव उड्डाणपुलावर कमी उंचीच्या सुरक्षा कठड्यांमुळे पुलावरून कोसळून दुर्घटना होऊ शकते. यासाठी कठड्याला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लोखंडी सुरक्षा कठडे (सेफ्टी रेलिंग) बसविण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली होती.
तर दुसरीकडे माजी सभापती कन्हैया भोईर यांनी सुद्धा याबाबत पत्र दिले होते. आजही सेफ्टी रेलिंग लागली नसल्याने अपघातादरम्यान वाहने खाली कोसळून मृत्यूच्या घटना समोर येत आहेत.