नायगावमधील बहुचर्चित उड्डाणपूल पुन्हा एकदा वादात सापडला आहे. शिवसेनेने या उड्डाणपुलाला दिवंगत शिवसेना नेते धर्माजी पाटील यांचे नाव देण्याचा जाहीर कार्यक्रम रविवारी आयोजित केला आहे. मात्र हे नामकरण बेकायदा असून त्याला कसलीच परवानगी नाही असे सांगितले जात आहे. विविध राजकीय पक्षांनी या उड्डाणपुलाला वेगवेगळी नावे देण्याची मागणी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणतर्फे नायगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा १.२९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. ९ वर्षे या उड्डाणपुलाचे काम रखडले होते. हा पूल सुरुवातीपासून वादात सापडला होता. पूल तयार होऊनसुद्धा त्याचे उद्घाटन करण्यात आले नव्हते. तत्कालीन सत्ताधारी पक्षाच्या एका मंत्र्यासाठी उद्घाटन थांबवून ठेवले होते. परंतु विविध राजकीय पक्षांकडून या पुलाचे उद्घाटनाचे कार्यक्रम उरकून टाकले होते. यानंतर पुलाला कुठले नाव द्यावे यावरून वाद निर्माण झाला होता.

नायगाव उड्डाण पुलाला नाव देण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस यांच्यामध्ये चढाओढ लागली आहे. शिवसेनेतर्फे दिवंगत धर्माजी पाटील, भारतीय जनता पक्षातर्फे दिवंगत खासदार चिंतामण वनगा तर काँग्रेस पक्षातर्फे, मायकल फुटय़ाडरे यांच्या नावासह एक डझन नावांची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.