वसई : नायगाव उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊनही अधिकृतरीत्या पूल खुला झालेला नाही. त्या कामास होत असलेला विलंब पाहता, आता विविध राजकीय पक्षांकडून या पुलाचे उद्घाटन करून पूल खुला करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे कधी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात येतो तर कधी बंद.
तीन आठवडय़ांपूर्वी नायगाव उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असल्याचे मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे जाहीर करण्यात आले होते. हा पूल सुरू झाल्यास वसईतून मुंबई यासह विविध ठिकाणी ये-जा करण्यास सोयीचे ठरणार आहे. परंतु या पुलाचे अधिकृत उद्घाटन करण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला मुहूर्त मिळत नाही. त्यामुळे नागरिक पूल सुरू होण्याच्या प्रतीक्षेतच आहेत. दुसरीकडे या उड्डाणपुलावरून राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. पुलाला नाव देण्यापासून त्याचे उद्घाटन कोणी करावे, इथपर्यंत विविध चर्चा आणि मतमतांतरे आहेत. प्रशासन पूल खुला करत नसल्याने विविध राजकीय पक्षांचे पुढारी पुलाचे उद्घाटन करत आहेत. नुकतेच मनसेने आक्रमक भूमिका घेत पूल खुला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बुधवारी सायंकाळी बहुजन विकास आघाडीचे नालासोपारा विधानसभेचे आमदार क्षितिज ठाकूर आणि कार्यकर्त्यांनी फीत कापून उड्डाणपुलाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले आणि वाहतुकीसाठी पूल खुला केला. अवघ्या काही तासांतच तो पुन्हा बंद करण्यात आला. रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा हा पूल बविआच्या कार्यकर्त्यांनी सुरू केला. गुरुवारी सकाळच्या सत्रात पूर्वेच्या बाजूचा एक वाहन जाईल इतकाच भाग खुला ठेवला होता. तर पश्चिमेच्या बाजूने दोन्ही भाग खुले ठेवण्यात आले. अधूनमधून प्रशासनाच्या मर्जीनुसार हा पूल चालू बंद करण्यात येतो. त्यामुळे नागरिकही याला कंटाळले आहेत.
या पुलाच्या संदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पश्चिम रेल्वे महाप्रबंधक कार्यालयाचे सचिव, सचिन शर्मा यांच्याकडून नायगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या सद्य:स्थिती व उद्घाटनासंबंधित तयारीची माहिती मागवली आहे.