वसई: नायगाव पूर्वेच्या परेरा नगर कॉलनी व अन्य ठिकाणच्या भागात मागील काही दिवसांपासून नियमित कचरा उचलला जात नसल्याने कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातून येणाऱ्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले असून नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नायगाव पूर्व येथील सुमारे ७ ते ८ हजार सदनिकांचा समावेश असलेल्या परेरा नगर कॉलनी परिसरात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कचरा व्यवस्थापनाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. परिसरात नियमित कचरा गाडी येत नसून अनेकदा तीन-तीन दिवस कचरा पडून राहत असल्याने नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावर कचरा टाकावा लागत आहे. त्यातच नियमित झाडूही मारला जात नसल्याने अस्वच्छता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

यएवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी ठेकेदाराने अवघे ११ सफाई कर्मचारी नेमले असून संपूर्ण परिसरासाठी फक्त एकच कॉम्पॅक्टर कचरा गाडी दिली आहे. तसेच गाडीसोबत येणारे कर्मचारी खाली सांडलेला कचरा उचलण्यास नकार देत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते चेतन घरत यांनी केला आहे.यापूर्वी कचरा टाकण्यासाठी डबे जागोजागी होते आता ते ही ठेवले जात नसल्याने कचरा टाकायचा तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या समस्येबाबत महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतर ही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.येत्या १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत कचरा व्यवस्थापन, नियमित साफसफाई आणि कचऱ्याचे डबे उपलब्ध करून देण्याबाबत ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर साई दुर्गा मित्रमंडळ व स्थानिक नागरिकांसह वसई-विरार शहर महापालिकेसमोर लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा चेतन घरत यांनी दिला आहे. याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त जितेंद्र नाईक यांच्याकडे विचारणा केली असता. तेथील नागरिकांच्या दैनंदिन कचरा उचलला जात नसल्याची तक्रार आहे. संबंधित विभागाच्या ठेकदाराशी बोलून प्रश्न मार्गी लावला जाईल असे त्यांनी सांगितले आहे.