वसई:- पालघर जिल्ह्यासह वसईच्या ग्रामीण भागात साजऱ्या होणाऱ्या यात्रोत्सवात कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित केले जातात. यंदाच्या वर्षीही सोमवारी नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथे १५८ वर्षांची परंपरा जोपासत कुस्त्यांचे जंगी सामने मोठ्या उत्साहात पार पडले. यात ८१ कुस्त्यांच्या लढती झाल्या.

वसई तालुका व पालघर जिल्ह्यात तसेच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कुस्ती पैलवान आहेत. या कुस्तीपैलवानांना प्रोत्साहन मिळावे यासाठी वसई विरार मध्ये भरणाऱ्या कुस्त्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. नायगाव पूर्वेच्या श्री चंडिका देवीच्या यात्रोत्सवानिमित्ताने
सोमवारी कुस्ती महामंडळातर्फे जंगी कुस्त्यांचे सामने ठेवण्यात आले होते.

यात मुंबई, भाईंदर, भिवंडी,नाशिक,वसई विरार अशा विविध ठिकाणच्या कुस्ती पैलवानांनी उपस्थिती दर्शवली होती.यात शंभराहून अधिक कुस्ती पैलवान होते त्यात काही महिला कुस्ती पैलवानांचा समावेश होता. आखाड्यात ८१ कुस्त्यांच्या लढती पार पडल्या. यात विजेत्यांना रोख रक्कम व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.या कुस्त्यांचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

मागील १५८ वर्षांपासून ही कुस्त्यांच्या आखाड्यांची परंपरा आहे ती जपण्याचा प्रयत्न आहे. यातून पैलवानांना प्रोत्साहन मिळेल असे कुस्ती महामंडळाचे केदारनाथ पाटील व निनाद पाटील यांनी सांगितले.