वसई : विविध रंगांच्या रांगोळ्यांची उधळण व कलाकारांची कल्पकता यांचा अनोखा संगम वसईतील रांगोळी प्रदर्शनातून दिसून येत आहे. नायगाव जूचंद्र येथील कलाकारांनी श्री चंडिका देवीच्या यात्रोत्सवानिमित्ताने विविध मनमोहक अशा रांगोळ्या काढल्या आहेत. या रांगोळ्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देऊन समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न कलाकारांनी केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जूचंद्र येथे यात्रोत्सवा निमित्ताने रांगोळी प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनात यंदाच्या वर्षी सुद्धा कलाकारांनी विविध ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या रांगोळ्या साकारल्या आहेत. यामध्ये जवळपास वीसहून अधिक रांगोळ्या असून त्यात संस्कार भारती, थ्रीडी, उठावदार, निसर्गचित्र,कणारांगोळी, पोर्ट्रेट असे विविध प्रकार वापरून सामाजिक विषय रांगोळीच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत.
यात नुकताच विरार येथे साकारण्यात आलेले द्वारकाधीश मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज यांची थ्री डी रांगोळी यासह तारपावादक पद्मश्री भिकल्या धिंडा, १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे, स्व अजित पवार यांच्या विशेष रांगोळ्या साकारण्यात आल्या आहेत.
तर आताच्या घडीला सोशल मीडिया, वाढती व्यसनाधीनता यावर आधारित ही रांगोळी साकारण्यात आली आहे.
या रांगोळ्या अतिशय ज्वलंत व मनाला भावणाऱ्या असल्याने विविध ठिकाणहून नागरिक या ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो भाविकांनी या प्रदर्शनाला भेट देत कलाकारांनी साकारलेल्या रांगोळ्यांचे कौतुक केले आहे.
